अवघ्या 12 तासांत होत्याच नव्हत झाले! मिरवणूकीनंतर मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू, अस काय घडलं?
गडहिंग्लज : तो आनंदाने सहभागी झाला. घरातून जेवून बाहेर आल्यानंतर त्याच्या डोक्यात अचानक कळा सुरू झाल्या. दवाखान्यात नेल्यानंतर मेंदूतील रक्तस्रावाचे निदान झाले. दरम्यान, कोल्हापुरात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हे सारे अवघ्या बारा तासांत घडले. अभिजित महादेव सावंत (वय ३२) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, अभिजित हा गुजर वसाहतीत राहतो. काल गल्लीतील मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. या मंडळाची साउंड सिस्टीम नसली तरी इतर मिरवणुकीतील साउंड सिस्टीम वाजत होते. मोठ्या उत्साहाने सर्व कार्यकर्ते, मित्रांसमवेत त्याने गणरायाला निरोप दिला.
रात्री साडेनऊच्या सुमारास गल्लीतील मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करून अभिजित घरी आला. जेवण केले. दरम्यान, त्याला एका मित्राने फोन करून बाहेर बोलावून घेतले. मित्राबरोबर त्याने आइस्क्रीम खाल्ले. साडेदहाच्या सुमारास त्याच्या डोक्यात अचानक कळा सुरू झाल्या. त्यामुळे मित्राने त्याला दवाखान्यात नेले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या डोक्याचे स्कॅनिंग केले. त्यात मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याला तत्काळ उपचारासाठी कोल्हापूरला नेले. रात्रभर उपचार सुरू होते. परंतु काल सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अभिजितच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. तो एकुलता होता. त्याचे भगवा चौकात मोबाईलचे दुकान आहे. त्याचा मित्रपरिवारही मोठा आहे. सर्व मित्राबरोबर आनंदात गणेश विसर्जन करून आल्यानंतर अवघ्या बारा तासांच्या अंतरात होत्याचे नव्हते झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.