"काँग्रेसच्या शाळेत शिकून तुम्ही पंतप्रधान झालात", मल्लिकार्जुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. यावेळी जंजगीर चंपा येथे आयोजित "भरोसे का संमेलन" कार्यक्रमातून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी म्हणतात काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं? काँग्रेसनं उघडलेल्या शाळेतच मोदी आणि शहांनी शिक्षण घेऊन आमदार, खासदार, मंत्री आणि आता पंतप्रधान झाले आहेत," अशी टीका त्यांनी यावेळी केली.
मोदी मणिपूरबाबत काहीच बोलत नाहीत
ते पुढे म्हणाले की, "नरेंद्र मोदींना देशाचे नंबर वन नेते म्हटले जाते, पण ते संसदेत मणिपूरवर काहीही बोलत नाहीत. मणिपूरमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, 500 हून अधिक लोक जखमी आहेत. 5 हजारांहून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी यावर बोलावं, अशी आमची इच्छा आहे. राहुल गांधी तिथे गेले, अनेकांना भेटले. तिथली परिस्थिती त्यांनी माध्यमांसमोर आणली. नरेंद्र मोदी नुसती नाटकं करतात, ते चुकून नाटक कंपनीऐवजी संसदेत आले असावेत," असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मोदी-शहांनी लंडनमध्ये शिक्षण घेतलंय का?
"काँग्रेसने 70 वर्षात काय केलं, असा प्रश्न भाजपवाले विचारतात. मोदी आणि शहा लंडनमध्ये शिकायला गेले नव्हते, त्यांनी काँग्रेसने सुरू केलेल्या शाळेतच शिक्षण घेतले आणि ते आम्हाला विचारतात, आम्ही 70 वर्षांत काय केलं. तुम्हाला शिकवलं, मंत्री-मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान केलं. मोदी आल्यानंतर वीज, एम्स, भिलाई स्टील प्लांट, शाळा बांधल्या असतील. मोदी येण्यापूर्वी देशात काहीच नव्हतं ना...आम्ही ज्या गोष्टी उभारल्या, त्या ते विकून खाण्याचे काम भाजप आता करत आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
बीजेपी फक्त 'राम भरोसे' अन् काँग्रेस 'काम भरोसे'
खर्गे पुढे म्हणतात, काँग्रेस फक्त 'राम भरोसे' नाही, तर 'काम भरोसे' आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो आणि त्यांची कामे करतोत. 15 लाख खात्यात येणार, 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार...पंतप्रधान अजून किती खोटं बोलणार? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि इतर नेत्यांनी देशासाठी काय केलं, ते जनता कधीच विसरणार नाही. भाजपला जिंकण्याचा विश्वास नाही, म्हणूनच ईडी, आयटी, सीबीआईची भीती दाखवत आहेत."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.