Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत

जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू सहकारी असलेले जयंत पाटील अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असता जयंत पाटलांनी त्यांची भेट घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यावर, स्वत: जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिलाय. त्यानंतर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्टपणे सांगतिले. आता, शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही जयंत पाटील यांच्याबद्दल विधान केलं आहे. जयंत पाटील कधीच भाजपात जाणार नाहीत, असे राऊत यांनी म्हटले.

राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम देताना, माझी आणि अमित शहांची भेट झाली नसून मी मुंबईतच आहे. मी कुठेही जाणार नाही, शरद पवार यांच्यासमवेतच पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता, या चर्चांवर संजय राऊत यांनीही मत व्यक्त केलं आहे. जयंत पाटील आणि आमचा DNA सारखा आहे. ते कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. आपला नेता, पक्ष अडचणीत असताना पळून जाणारे जयंत पाटील नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, सध्या या देशात संसद, विधिमंडळ हे उध्वस्त करण्याचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

दिल्लीचे अधिकार काढून घेण्याचा डाव

दिल्लीला पूर्ण राज्य देण्याची घोषणा निवडणुकीत भाजपने केली होती. पण, ते भाजप आहे, ते आता अधिकार काढून घेत आहेत. आता सगळा कारभार नोकरशहाच्या हाती देत आहे. तुम्हाला लोकशाही मान्य नाही हे दिसतंय. राज्यपालांच्या हाती तुम्ही कारभार देणार आहे. राज्यपाल महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणात दिसतात. बाकी कुठं दिसत नाहीत. आम्ही या विधेयकाला विरोध करणार आहोत, असंही संजय राऊतांनी म्हटलं.

काय म्हणाले जयंत पाटील

''मी आता या चर्चांवर रोज सकाळी येऊन स्पष्टीकरण देणार नाही. रोज नव्या बातम्या समोर येत आहेत, राज्यात रोज गैरसमज पसरवले जात आहेत. मी रात्री अनिल देशमुख, राजेश टोपे,सुनिल भुसारा आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत एकत्र होतो. आज सकाळी मी शरद पवार साहेबांची भेट घेतली. या भेटीत आम्ही पक्षवाढीवर चर्चा केली. माझ्याविषयी लोकांच्या गैरसमज पसरवला जात आहे,'' असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. त्यानंतर, आता जितेंद्र आव्हाड यांनीही जयंत पाटील कुठेही जाणार नाहीत, यासंदर्भात आम्हा दोघांची चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.