पुढच्या वर्षी म्हणजे ‘१५ अॅागस्ट २०२४ ला भाषणाला मीच असेन’, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. पण...
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे १० वे भाषण मंगळवारी झाले. पुढच्या वर्षी म्हणजे ‘१५ अॅागस्ट २०२४ ला भाषणाला मीच असेन’, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. ‘लाल किल्ल्यावरील सगळे विक्रम मोदीसाहेबांनी मोडले,’ असे समाजमाध्यमांनीही जाहीर केले. तरीही अजून एक विक्रम त्यांना मोडायचा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून १६ वेळा भाषणे केली. ‘पुढच्यावर्षी मीच भाषण करीन,’ असे न म्हणता केली. १९४७ ते १९६३... पंडित नेहरू यांच्या नावावर हा जो विक्रम आहे, तो अजून कोणी मोडलेला नाही. मोदीसाहेबांनी दहा भाषणे केली आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळीत नेहरू घराण्यातील प्रत्येक सदस्याने सहभागी होवून कारावास भोगला. एकूण १७ वर्षे ६ महिने नेहरू परिवारातील प्रत्येक सदस्याला तुंरुगवास भोगावा लागला.
त्यापैकी तब्बल दहा वर्षे एकट्या पंडित नेहरू यांना ब्रिटीश सरकारच्या तुरुंगात काढावी लागली. नेहरू जेवढे वर्षे िब्रटीशांच्या तुरुंगात होते तेवढी वर्षे मोदीसाहेबांनी दहा वर्षे पंतप्रधान म्हणून झेंडा फडकवला आहे. नेहरूंनी १६ वर्षे झेंडा फडकवला आहे. ‘पुढच्या वर्षी मीच झेंडा फडकवीन’, असे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे... महाराष्ट्रात ‘पुन्हा मीच मुख्यमंत्री म्हणून येईन...’ असे २०१९ साली देवेंद्र फडणवीस म्हणाले होते... त्यांना अजूनतरी ते काही जमले नाही.
त्यांचेच वाक्य ‘कॉपीराईट’सारखे वापरून मोदीजींनी ‘पुढच्या वर्षी पुन्हा मीच...’ असे जाहीर करून टाकले आहे. पुढच्यावर्षी कोणाच्या हस्ते झेंडावंदन व्हावे, हे देशातील मतदार ठरवतील... एक गोष्ट मात्र चांगली झाली... पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होईल, एवढीतरी हमी मिळाली हे ही काही कमी नाही... बहुमत कोणत्या पक्षाला, हे मतदार ठरवणार आहेत. मतदारांनी दोन वेळा भाजपाच्या बाजूने कौल दिला. तिसऱ्यांदा जनतेने तसाच कौल दिला तर मोदींच्या हस्तेच ध्वजवंदन होईल. तरीही पंडितजींचा विक्रम मोडायला त्यांना अजून दोन निवडणुका म्हणजे २०२९ ची निवडणूक जिंकून ते बरोबरी (१६ वेळा) करू शकतील... आणि विक्रम मोडायला त्यांना २०३४ ची निवडणुकही जिंकावी लागेल! हा झाला तारखा आणि वर्षांचा तपशील... व्यवहारात काय घडेल ते मतदार ठरवणार...
२०१४ च्या निवडणुकीत भाजपातर्फे मोठी घोषणा देशभर झळकली. ‘मेहंगाई की पडी मार.... अब की बार... मोदी सरकार...’ या घोषणेवर भाजपाचे सरकार आले. त्यानंतर गेल्या ९ वर्षांत महागाईने उच्चांक गाठला. आज भाजपाचा कोणीही नेता महागाईवर बोलत नाही. पंतप्रधान बोलत नाहीत. विरोधी पक्षाचे नेते बोलत नाहीत... ते आण्णा हजारेही गायब आहेत... मेणबत्तीवाल्यांच्या मेणबत्या विझल्या आहेत. महागाईविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. आज्ाच्या तारखेला महागाईविरोधात देशात कोणतेही आंदोलन नाही. भारताच्या इितहासात पहिल्याप्रथम रिझर्व्ह बँकेने ‘हाताच्या बाहेर गेलेल्या महागाईवर’ चिंता व्यक्त केली आहे. रुपयाची किंमत १४ पैसे झाली आहे. डॉलर ८३ रुपये झाला आहे. जी.एस.टी. नंतर या महागाईचा बडगा राेजंदारीच्या मजुरीवर जगणाऱ्या सामान्य माणसाचे जीवन अशक्य झालेले आहे. ज्यांचे नियमित पगार आहेत आणि ज्यांचे पोटावर हात आहेत, त्यांना अॅागस्ट महिन्यात सात-आठ सुट्या आल्या तरी, त्यांच्या पगारात फरक पडत नाही.पण ज्यांचे पोट हातावर आहे त्या सामान्य माणसांची संख्या या देशात अजूनही ५० टक्क्यांच्या वर आहे. हातावर पोट असलेले कष्टकरी, मजूर, कोरडवाहू शेतकरी, रोजंदारीवरील कामगार, यांना २०१४ सालात वस्तुंचे जे भाव होते त्याच माणसाला आज कोणत्या भावात वस्तुंची खरेदी करावी लागत आहे... आणि या महागाईच्या झळांमुळे गरीब माणसांचे सगळे घर कसे कोसळत चालले आहे... २०१४ साली जीवनाश्यक वस्तुंचे भाव काय होते.... गहू... तांदूळ... तेल... डाळ... चहा... साखर... दूध... प्रवास... डिझेल... पेट्रोल.... एक विषय असा सांगा की, ज्याचे भाव दुप्पट-तिप्पट झालेले आहेत. सामान्य माणसाला आणखीन मोठा खर्च म्हणजे आरोग्याचा खर्च.... शासकीय रुग्णालयांची अवस्था आज काय आहे.... खाजगी रुग्णालयातील उपचारांचे दर काय आहेत... तेही सामान्य माणसाला परवडणारे आहेत का? गेल्या दहा-बारा वर्षांत िकती टक्के लोकांचे भले झाले..
त्यात कोरोना काळात झालेली बेरोजगारी त्याच्यापूर्वी नोटाबंदीने झालेली बेरोजगारी... मोदीसाहेब दरवर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते... तशी घोषणा २०१४ साली झाली होती. म्हणजे गेल्या ९ वर्षांत देशात १८ कोटी रोजगार वाढायला हवे होते. िकती रोजगार वाढले, याची अधिकृत आकडेवारी सरकार देईल का? छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा की, रोजगार वाढले की, रोजगार घटले? राजकीय अभिनवेष बाजूला ठेवा... गेल्या दहा वर्षांत महागाईने सामान्य माणूस हैराण झाला आहे की नाही? शाळा- कॉलेजच्या प्रवेशाची फी परवडणारी राहिली आहे का? शिक्षण महाग झाले की नाही? सगळे जीवन उद्धवस्त व्हायची वेळ आली. घोषणा खूप मोठ्या झाल्या. पण, व्यवहारात घरातील ज्या गृहीणीला स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरची गरज आहे... त्याची पंतप्रधान यांच्या फोटोसहीत केवढी जाहिरात केली होती... २०१४ साली सिलिंडरचे भाव काय होते..? आज भाव काय आहेत? २०१४ साली मनमोहन सिंग सरकारच्या शेवटच्या दिवशी डिझल-पेट्रोलचे भाव काय होते... जाहीर करा... आजचे भाव िकती टक्के वाढ झाली... एक विषय असा दाखवा की, त्यामुळे सरकार आपल्या बाजूचे आहे, असे सामान्य माणसाला वाटेल.
प्रचाराकरिता ‘सरकार आपल्या दारी’ अशा घोषणा झाल्या... त्यासाठी प्रभातफेऱ्या निघाल्या... मंत्र्यांचे दारोदार दौरे झाले... पण, फरक काय पडला? आजच्या घटकेला महागाईचा उडालेला भडका दुसऱ्या बाजूनी अत्यंत महत्त्वाच्या शासकीय आरोग्य यंत्रणेचा बोजवारा... तिसरीकडे बोगस बियाणे... दुबार पेरणी... मजुरीचे वाढलेले भाव... सरकारकडून शेतकऱ्याच्या नावावर ६००० रुपये चढवून गॅस सिलिंडरच्या किमतीतून १५००० रुपये काढून घेण्याची युक्ती... याच मोदीसाहेबांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जी.एस.टी. ला ‘प्राणपणाने’ केलेला विरोध... आणि अता त्याच जी. एस. टी. चा अतिरेक... प्रत्येक वस्तु पॅकींग करून विक्रीची सक्ती... त्याववर जी. एस. टी... या सर्व काळात अंबानी-अदानी असोत... किंवा कर्ज बुडवणारे मल्ल्या असोत... यांच्या श्रीमंतीत झालेली वाढ आणि गरिबांचे जीवन याचाही कुठे लेखा-जोखा घेतला असता तर प्रामाणिकपणाने चर्चा झाल्याची लोकांची भावना झाली असती. राज्यकर्ता कोण आहे, अधिकारावर कोण आहे, सत्ता कुणाकडे आहे, याच्याशी सामान्य माणसाला काही घेणे-देणे नाही... गेल्या दहा वर्षांत सामान्य माणसांची सगळ्या बाजूंनी कोडी झाली. त्याला जीवन जगणे कठीण झाले आहे.अाजपर्यंत असे कधीही नव्हते. आजची जी महागाई आहे याच काळात काँग्रेसचे सरकार असते तर, हेच भाजपावाले रस्त्यावर थयथया नाचले असते. भाजपवालेच कशाला... आमच्या मृणालताई असत्या तरी हजारो महिला लाटणं घेवून बाहेर पडल्या असत्या. आज २०० रुपये किलो टोमॅटोचा भाव झाला त्याचे कोणालाही काही पडलेले नाही. आज लढणारे नेतृत्त्वच नाही. सामान्य माणसाला नेताच नाही. आमचे उद्धवराव पाटील नाहीत... एन. डी. पाटील नाहीत... गणपतराव देशमुख नाहीत...’ तिकडे विदर्भात जांबुवंतराव धोटे नाहीत... आज आचार्य अत्रेसाहेब आणि ‘मराठा’ असता तर त्यांनी सरकारला फाडून काढले असते. त्यांना सामान्य माणसांच्या प्रश्नांची आच होती...
दुसरीकडे राज्यात धटींगणपणा एवढा वाढला आहे की, ‘आम्ही काय हवं ते करू शकतो.’ असा धिंगाणा उघडपणे चालू आहे. हजारो महिला बेपत्ता होत आहेत. त्याच्याबद्दल ना समाजमाध्यमे बोलतात... ना नेते बोलतात... सगळी समाजमाध्यमे एकाच नळावर पाणी भरत आहेत... एकप्रकारची अघोषित दहशत देशात अवतरलेली आहे. त्याविरोधात आवाज उठवणारे कोणी नाही. ब्रिटीशांचे कायदे जरूर बदला... पण, िब्रटीशांच्या कायद्यात जे नव्हते त्या कच्च्या कैद्याला ९० दिवसांची कोठडी, हे कलम भारतींना आपल्या कायद्याचा अभिमान वाटावा असे आहे की, यात सूडबुद्धी आहे? गेल्या दहा वर्षातील एकही विषय असा नाही, जो ठामपणे सामान्य माणसाच्या बाजूचा आहे. हे सर्व लोक शांतपणे पाहत आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत झेंडा कोण फडकवेल याचा िनर्णय लोक करतील... लोकांनी मोदींच्या बाजूंनी कौल दिला... तर मोदीजी फडकवतील... त्याचा दुसरा अर्थ लोकांना हे सर्व मान्य आहे. असाच स्वीकारावा लागेल... लोकशाहीचा संकोच झाला तरी चालेल... धार्मिक तेढ निर्माण झाली तरी चालेल... मणिपूर पेटत राहिले, तरीही चालेल... धार्मिक उन्माद वाढला तीरही चालेल... हे लोकांना मान्य असेल तर लोक तसा निर्णय करतील... शेवटी हे सगळं मतदारांवर अवलंबून आहे. शिक्षणाने... वाचनाने... घडत असलेल्या घटनांनी... हा मतदार सुजाण झाला असेल... लोकशाही... घटना... सर्वधर्म समभाव... या सर्व शब्दांचा अर्थ त्याला कळला असेल तर तो योग्य िनर्णय घेईल.. पण, जो फार शिकलेला नाही... त्यालाच जे काही घडत आहे त्याचे चटके जास्त बसत आहेत. तो अधिक शहाणा मतदार आहे.... हेच या देशात सिद्ध होईल. त्यामुळे त्याच्या बाजूने उभे राहणे आज सर्वात आवश्यक आहे. आणि नेमका त्याच्याबाजूने उभा राहणारा नेताच देशात नाही. पदावर असलेला नेता नसतोे... जे पदावर नाहीत ते लोकांच्या बाजूने जेव्हा उभे राहतात.. तेव्हा त्याचे मूळ प्रश्न मांडले जातात. ५१ टक्के बहुमत असलेले सत्तेत राहतात... त्याचेच नाव लोकशाही आहे. पण ४९ टक्के लोकांच्या प्रश्नावर जो रस्त्यावर लढतो, तो लोकशाहीतला सर्वात मोठा नेता असतो. आज महाराष्ट्रात त्या नेत्याचा दुष्काळ आहे.
महाराष्ट्राचा विषय निघाला म्हणून एक मुद्दा सांगितला पाहिजे. तोड-फोडीच्या राजकारणाने महाराष्ट्राची शकलं झालेली आहेत. महाराष्ट्रात मोदी-शहा-फडणवीस हे सगळे एकट्याच भाजपाच्या ताकतीवर उतरले तरी महाराष्ट्रात त्यांना बहुमत मिळवता येणार नाही. म्हणून ही ताेडफोड आहे. शिंदे गटाची तोड-फोड त्यासाठी झाली... आणि ती तोड-फोड झाल्यावर शिंदे यांची टीम बहुमत मिळवून द्यायला कमी पडेल, म्हणून राष्ट्रवादीत तोडफोड झाली. कारण महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. उत्तरप्रदेशच्या खालोखाल... अिजतदादांबद्दल प्रेम आहे म्हणून त्यांना पद दिलेले नाही. पण हेच दादा दोन महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेत काय बोलले होते? अकोला-वाशीमच्या दंगली भाजपाने घडवलेल्या आहेत, असा जाहीर आरोप दादांनी केला होता. तेच दादा आज त्यांच्यासोबत हात बांधून फोटोत उभे आहेत. राजकीय तत्त्वज्ञाान हा विषय दादा आणि त्यांच्या टीमसोबत फारसा महत्त्वाचा नव्हता. ‘सत्ता हेच महत्त्वाचे साधन आहे’, असं माणणारे ते सर्वजण आहेत. सत्तेशिवाय ते जगू शकत नाहीत. त्यामुळे ठाम राजकीय भूमिका, राजकारणातील मूल्य... या शब्दांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. दादांच्या टीममधील भुजबळ पुन्हा मंत्री झाले. त्यांनी एक छान मागणी केली... काय म्हणाले ते... ‘मनोहर भिडेंना अटक करा... नाहीतर महाराष्ट्रात गोंधळ होईल...’ भुजबळसाहेब अनेक वर्षे आमदार आहेत... विरोधी बाकावर असताना ‘भूखंडाचे श्रीखंड’ म्हणणारे तेच होते... त्याच पवारसाहेबांना ‘विठ्ठल’ म्हणणारेही तेच आहेत! ‘भिडेंना अटक करा...’ ही त्यांची मागणी. भुजबळसाहेब, तुम्ही आता विरोधी बाकावर नाहीत.. सत्ताधारी आहात... तुम्ही मागणी करायची नाही.. कृती करायची... तुम्ही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना, लटुपटूची का होईना... बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होतीत आणि महापौर बंगल्यात ठेवले होते. महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतावर त्या ‘भिडू’ ने हल्ला केला... तुम्ही अटकेची मागणी केली... अटक करून दाखवता का? आणि जर अटक झाली नाही तर गोंधळ माजवून दाखवता का? तुमचा राजीनामा तोंडावर भिरकावून सत्ता सोडून देवू शकता का? महात्मा फुले यांचा अपमान सहन करून आपण सत्तेत राहिला अाहात.
राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यापैकी एका मुख्यमंत्र्याचे हे ‘भिडू’, गुरुजी आहेत. करून दाखवा अटक... आणि नाही करून दाखवलीत तर गोंधळ करून दाखवा... सत्तेसाठी किती पायंड्या खाली उतरायचे आणि पुन्हा महात्मा फुले समता परिषदेचे नेते म्हणून घ्यायचे... लोकांना हे सगळे समजते आहे. शिंदेसाहेब आणि त्यांच्या गटाला ज्याप्रमाणे भाजपामागे फरफटत जावेच लागेल. हा गट स्थापन झाला तेव्हा प्रत्येक पोस्टवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे मोठे फोटो होते. मोदी आणि शहा यांचे फोटो लहान होतेे.... एक महिन्यातच बदल झाला...
कोणाचे फोटो मोठे झाले बघा... राष्ट्रवादीचा जो फुटलेला गट आहे त्याची अवस्था तीच होईल... सत्तेत आलेत तरी तुम्हाला पवारसाहेबांचा फोटो अजूनही वापरल्याशिवया पर्याय नाही. २०२४ च्या निवडणुकीपर्यंत हे चालेल... एकदा तुमचा वापर करून घेतला आणि भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे काम फत्ते झाले की, मग कोण दादा आणि कोण शिंदे... दादा म्हणतात, ‘आम्ही राष्ट्रवादीचे अस्तित्त्व वेगळे ठेवू...’ दादांना सांगायला हवे... शरणागताला वेगळे अस्तित्त्व नसते. हे तुम्हाला २०२४ नंतर कळेल...
अजितदादा असं का वागले? फक्त सत्तेसाठी. सत्तेच्या बाहेर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक साहित्यिक अशा कोणत्याही क्षेत्रात दादा कुठे असताता का हे दाखवा... त्यांची प्रशासनावर पकड आहे... ते लोकांची कामे मार्गी लावतात. ते सर्व ठीक आहे.. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे ही ठीक आहे.. ‘चारवेळा उपमुख्यमंत्री होतो... आता मला मुख्यमंत्री व्हायचे आहे,’ असे ते जाहीरपणे म्हणाले. त्यांची इच्छा कधीतरी पूर्ण होवो. पण, ‘माझे काका चारवेळा मुख्यमंत्री होते... ते एकदा पंतप्रधान झाले पाहिजेत’ असे ते कधी म्हणाल्याचे ऐकले, वाचले नाही... पवारसाहेबांनीच सांगून टाकले, ‘जे भाजपासोबत गेले ते गेले...’ पवारसाहेबांनी खुलासा करून टाकला हे बरे झाले... संभ्रम िनर्माण करू नका, असेही त्यांनी सांगितले. पण, पवारसाहेबांना नम्रपणे सांगायला हवे की, तुमच्यासोबत जो तुम्हाला मानणारा महाराष्ट्र आहे त्याच्या मनात संभ्रम निर्माण होईल, असे काहीतरी घडले म्हणून संभ्रमाचे वातावरण तयार झाले. वाहिन्यांना काय दाखवायचे ते दाखवू द्या... त्या वाहन्यांवर लोकांचा फार विश्वास नाही. तुम्ही केवळ अजितदादांचे कुटुंबप्रमुख नाहीत... तुम्ही महाराष्ट्राचेही कुटुंबप्रमुख अाहात. त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याचा हक्क दादांएवढाच आहे. दादा कोणत्याही पक्षात गेले तरी तुम्हाला ते भेटणे, यात गैर काहीच नाही. तुम्ही कोणत्याही राजकीय माणसाशी शत्रूत्त्व कधी करत नाही. विजयसिंह मोहिते-पाटील यांची तब्बेत बिघडली तर तुम्ही त्यांना भेटायला अकलूजला त्यांच्या घरी गेलात... हा सुसंस्कृतपणा महाराष्ट्रात सध्या एकाच नेत्याकडे आहे. आिण ते तुम्हीच आहात. १ अॅागस्टला लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असल्यामुळे तुम्ही मोदीसाहेबांच्या व्यासपीठावर गेलात... तुम्ही राजशिष्टाचार कसा पाळता, हे महाराष्ट्राला माहिती आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना वर्षा बंगल्यावर भेटायला जायला तुम्हाला संकोच वाटत नाही. तुमच्या भूमिका स्वच्छ आहेत. पदावरील व्यक्तीचा सन्मान कसा ठेवायचा... मग त्याचा पक्ष कोणताही असो... हे तुमच्याकडून शिकावे. त्यामुळे अजितदादा तुम्हाला भेटायला आले किंवा तुम्ही त्यांना भेटलात.... उलट कौटुंबिक भेटी व्हायलाच पाहिजेत... ताण-तणाव राहता कामा नये... ही तुमची भूमिका महाराष्ट्राला मान्यच आहे. जे गेले त्यांच्या मतदासंघात तुम्ही नवीन टीम तयार कराल, याचीही महाराष्ट्राला खात्री आहे. तुमच्या वयाची चर्चा भाजपावाले करतात.. पण तुमच्या मानसिक इच्छाशक्तीचे वय ४० वर्षे आहे. त्यामुळे महाराष्ट्र घुसळून काढून दोन फुटलेल्या होड्या भाजपाबरोबर गेल्या तरी महाराष्ट्रात भाजपाची बोट बुडवण्याची ताकद तुम्ही, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नक्कीच आहे. परवा तुम्ही चांगले वाक्य उच्चारलेत.... उद्धव ठाकरे, मी आणि बाळासाहेब थोरात, नाना पटोले आम्ही एकत्र काम केले की, महाराष्ट्राचे चित्र बदलून टाकू...त्याचमुळे ‘जे गेले त्यांना जाऊ द्या... त्यांचं भलं होऊ द्या..’ पण दादा-शिंदे यांना बरोबर घेवूनही निदान महाराष्ट्रात तरी भाजपाची डाळ शिजणार नाही... दिल्लीत पुढच्या वर्षी झेंडावंदन कोण करेल, हे मतदार ठरवतील... पण महाराष्ट्रात लोकसभेच्या बरोबर विधानसभा निवडणूक झाली तर, भाजप सरकारच्या नेतृत्त्वाखाली १५ अॅागस्ट २०२४ चे झेंडावंदन होणार नाही, इवढं मात्र नक्की. ठरल्याप्रमाणे विधानसभा निवडणूक अॅाक्टोबर २०२४ झाली तर २६ जानेवारी २०२५ चे झेंडावंदन भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली होणार नाही, हे ही नक्की.सध्या एवढेच📞 9892033458
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.