अजित पवारांचं मोठं विधान
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यामध्ये ज्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचं सहकार्य आणि मंजुरी लागेल ते तात्काळ देण्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यातील विकास काम वेगानं पूर्ण करणं ही शासनाची प्राथमिकता आहे. त्या अनुषंगानं सर्व कामाला लागले आहे, असही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण केली जातील. त्याचबरोबर पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचं काम देखील वेगानं सुरू केलं जाईल. ही काम कुठल्याही कारणांमुळं थांबवली जाणार नाही. राज्यामध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले जातील. त्याचबरोबर दर आठवड्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामांचा आढावा घेतला जाईल.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “पुणे शहरातील शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, कृषी भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, सहकार भवन, शिरूर खेड कर्जत मार्गाचा चौपदरीकरण, त्याचबरोबर मुंबई शहरातील जीएसटी भवनासह राज्यातील अनेक विकास काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. राज्यातील ज्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचं सहकार्य आणि मंजुरी लागेल, ते केंद्र सरकार आपल्याला तत्काळ देईल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. त्यामुळं आता राज्यातील विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत.”
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.