सागंली:जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्जप्रकरणे, नोकरभरती, तारण मालमत्ता घोटाळा यांची मालिकाच सुरू आहे. या प्रकरणात माजी अध्यक्ष, संचालकांसह काही विद्यमान मंडळींची चौकशी सुरू आहे. सहकार विभाग त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष का करत आहे?
जिल्हा बँकेचे 'टायटॅनिक' होण्याची वाट पाहताय का, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी केला आहे.
याबाबत जाधव यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक ही अर्थवाहिनी आहे. येथून सामान्य शेतकऱयांना कर्ज मिळते, अन्यथा राष्ट्रीयकृत बँका त्यांना दारात उभे करून घेत नाहीत. ही बँक सत्ताकारण राबवायला, नेत्यांच्या सोयी करायला, संस्था लाटायला उपयोगात आणली जाते, असा इतिहास आहे. परंतु, असे करणाऱयांवर कारवाई मात्र होत नाही. फक्त सोयीस्कर राजकीय व्यवहार होत आला आहे
आटपाडी तालुक्यातील देवस्थानच्या 77 गुंठे जमिनीवर 2 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे प्रकरण ताजे आहे. हे करताना मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी डोळेझाक केल्याचे दिसते. त्यांनी या प्रकरणात धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतली होती का? त्या 77 गुंठे जमिनीचा रेडीरेकनरनुसार भाव किती होतो, याची शहानिशा केली होती का? सर्च रिपोर्ट घेतला होता का? सातबारा उताऱयावर देवस्थान जमीन असा उल्लेख नव्हता का? इतकी मनमानी कशी करू शकता? या संपूर्ण प्रकरणात आधी मुख्य अधिकाऱयांची चौकशी झाली पाहिजे.
सांगली जिल्हा बँकेच्या आजवर 157 कोटी आणि 47 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात चौकशा झाल्या आहेत. त्याचे काय झाले? अध्यक्ष मानसिंगराव नाईकांनीच तक्रार केल्यानंतर अलीकडे झालेल्या चौकशीत गंभीर दोष आढळले आहेत, त्याचे काय होणार? ही बँक बुडेपर्यंत वाट पाहू नका. अन्यथा, आम्हाला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.