नरेंद्र मोदी हे देशाला धोकादायक, त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार करावा : प्रकाश आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता देशाला धोकादायक झाले आहेत. त्यांना समर्थन देणार्या हिंदू संघटनांनी आता यावर फेरविचार केला पाहिजे असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मणिपूरच्या मुद्यावरुन देखील आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींनी सर्वात आधी मणिपूरमध्ये मैतेई जातीला आदिवासींचा दर्जा का दिला? तशी मागणी होती का? हे त्यांनी स्पष्ट करावं असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना आपण आगामी लोकसभा अकोल्यातूनच लढणार असल्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.
प्रकाश आंबेडकर यांनी 'एबीपी माझा'ला 'एक्सक्लूझिव्ह' मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या अनेक राजकीय मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला. मणिपूर, अविश्वास ठरावावरील पंतप्रधान मोदींचं भाषण, संसदेत राहूल गांधींच्या 'फ्लाईंग किस'वरून भाजपनं उठवलेली राळ, नवी तयार झालेली 'इंडिया आघाडी', सध्याची काँग्रेसची भूमिका, उद्धव ठाकरेंबद्दल आंबेडकरांचं मत, महाविकास आघाडीत वंचितची संभाव्य एंट्री अशा विविध मुद्यांवर त्यांनी संवाद साधला. मणिपूरच्या प्रश्नाचा आर्थिक धाग्यानं विचार करता भाजपला जो पॉलिटिकल फंड मिळतो त्यात चिनी कंपन्यांनी मदत केली आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. त्यामध्ये चीनने उडी मारली तर बोंबलता कशाला? असेही ते म्हणाले. मी अदानी आणि मणिपूर संबंध यावर नंतर सविस्तर बोलेन असेही आंबेडकर म्हणाले.
माझ्यासारखे भाजपाविरोधात असणारे तुम्ही का घेत नाहीत?
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपविरोधी तयार झालेल्या इंडिया आघाडीवर देखील वक्तव्य केलं. या आघाडीत एसटी, एससी, ओबीसी नाहीत. माझ्यासारखे भाजपाविरोधात असणारे तुम्ही का घेत नाहीत? असा सवाल आंबेडकरांनी केला. मुंभत भाजपविरोधी पक्षांची बैठक होमार आहे. या बैठकीचे मला कोणतेही निमंत्रण नाही. मुंबईतील बैठकीच्या निमंत्रणाची मी वाट बघत असल्याचे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, माझे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याशी घरगुती संबंध होते. तसेच अशोक चव्हाण यांच्याशी देखील घरगुती संबंध आहेत. त्यांच्याशी राजकारणापलिकडचा संवाद असल्याचे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, काँग्रेस नेते वेणुगोपाल यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंवर आमचा पुर्ण विश्वास
महाविकास आघाडीत समावेश करण्यासंदर्भातील जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. ते भूमिका पार पाडतील. उद्धव ठाकरे शब्दांचा पक्का माणूस असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे चांगला माणूस आहे. ते छान बोलतात, कमी बोलतात, पण ठोस बोलतात असेही आंबेडकर म्हणाले. आमचा उद्धव ठाकरेंवर पुर्ण विश्वास असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. औरंगजेबाच्या मजारीसंदर्भात देखील आंबेडकरांनी वक्तव्य केलं. आम्हाला दंगल थांबवायची होती. म्हणून तिथे गेलो, म्हणूनच दंगली थांबल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.