बहुमत असताना फोडाफोडीचे गरज का ? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
सांगली : राज्यात भाजप-शिंदे सेनेचे बहुमत असताना दुसरे पक्ष फोडाफोडीची भाजपाला गरज काय? लोक मतदान करणार नसल्याने भाजप राज्यात पक्ष फोडाफोडी करत असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते. देशात आणि महाराष्ट्रात बेरोजगारी मोठी आहे, विद्यमान सरकार काही करत नाही. केवळ महापुरुषांना शिव्या घालण्यासाठी कोणाला तरी पुढे करत आहे, मतांचे धृवीकरण करण्याचा उद्योग देशात आणि राज्यात सुरू असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
मराठा आरक्षणावर बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, मनापासून मराठा आरक्षण द्यायचे असेल, तर केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची अट काढली पाहिजे. ही अट काढली तर देशातील आरक्षणाचा प्रश्न मिटून जाईल जाईल. मराठा आरक्षणासाठी तरुणांनी आंदोलन करायला पाहिजे. महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत जाऊन आंदोलन करायला पाहिजे.
आता प्रशासक राज सुरू होणार
राज्यात निवडणूका झाल्या नसल्याने चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्यात गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका घेतल्या नाहीत. कारण राज्यातील सरकारला सरकारी अधिकारी पाहिजेत, आता प्रशासक राज सुरू आहे. लोकशाहीला तिलांजली देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. लोकसभा आणि विधानसभेला निवडून येणार नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जात नसल्याची टीका त्यांनी केली.
पण दरबारी कधी येणार?
दरम्यान, कोल्हापुरात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, फक्त गतिमान सरकार म्हटलं जातं पुढे काही होत नाही. शासन आपल्या दारी आलं पण दरबारी कधी येणार हा प्रश्न आहे. कोल्हापूरला अडीच महिने आयुक्त नाही. या शासनापेक्षा पतपेढी बरी चालली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती नाही पाहिल्यास अवघड आहे. ग्रामीण भागातील संस्थांचा विकास झाला पाहिजे, सहकारी संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप होता कामा नये. नियंत्रण असलं पाहिजे, पण राजकीय हस्तक्षेप वाढवू नये. राजकीय हेतूनं अडवाडवी केली तर संस्थांचा उपयोग राजकारणासाठी होईल.
इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यावेत
हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. या सरकारला लोकसभा आणि विधानसभा यावर परिणाम होईल अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा झाल्याशिवाय या निवडणुका घेतात की नाही याबद्दल शंका आहे. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यावे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, पण याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. ते इंडिया सोबत आले तर त्यांचा आघाडीला फायदा होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.