Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

क्रांतिकारी ऑगस्ट महिना..‘गर्जा जयजयकार

क्रांतिकारी ऑगस्ट महिना..‘गर्जा जयजयकार

ऑगस्ट महिना सुरू झाला की, एक उत्साह संचारतो. या महिन्यातील घटना, क्रांतिकारी ९ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाचा १५ ऑगस्ट हे तर या देशाच्या अिभमानाचे दिवस आहेत. पण या संपूर्ण महिन्यात केवढी मोठी माणसं जन्माला आली किंवा त्यांचा स्मृतिदिन... ती प्रत्येक आठवण भारावून टाकणारी आहे. महिन्याची सुरुवातच होते ती लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीने.... तेव्हा लहानपण आठवते... दुसरी-तिसरी इयत्तेत असताना टिळक पुण्यतिथीला शाळेत केलेले पहिले भाषण... ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच...’ ही टिळकांची गर्जना देशाला खडबडून जागी करून गेली तो काळ समोर येतो.. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या महिन्यात आपणास घोषणा द्यावी लागेल... ‘लोकशाही आणि सर्वधर्म समभाव हा देशाचा प्राण आहे... आपण त्याचे प्राणपणाने रक्षण करू या... ’ आज याच घोषणेची गरज आहे. याच महिन्यात जन्माला आलेले आण्णाभाऊ साठे यांचा डफ कडाडला... केवढा महान शाहीर आणि लेखक होता आण्णाभाऊ... त्यांची आणि अमर शेख यांची महाराष्ट्राने कदर केली नाही. या लेखातील सर्व चित्रांमधून या महिन्यातील मोठी माणसं डोळ्यांसमोर येतील. तीन क्रांतिकारकांचा स्मृतिदिन याच महिन्यात.... क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती याच महिन्यातील. काय योगायोग....

ऑगस्ट क्रांती मैदानावरील महात्मा गांधी यांच्या आदेशानंतरचा लढा सगळ्या देशाला थक्क करून गेला. स्वातंत्र्य मिळवताना कोण, कसे लढले? कोणत्या पक्षाचे नेते लढले? हा इितहास कोणालाही कधीही पुसता येणार नाही. त्याच लढ्याचे सेनानी अच्युतराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन याच महिन्यातला. काँग्रेसचे अध्यक्ष सूरेंद्रनाथ बॅनर्जी यांचाही स्मृतिदिन याच महिन्यातला. सुभाषबाबूंचाही स्मृतिदिन याच महिन्यातील. भगतसिंग यांचे सहकारी राजगुरू यांची जयंतीही याच महिन्यातील. भगतसिंग यांची ती क्रांतीकारी घोषणा.... ‘इन्कलाब जिंदाबाद...’ ‘बहेरोंको सुनाने के लिए धमाकेकी जरूरत होती हैं...’ हे भगतसिंग यांचे फाशी जाण्यापूर्वीचे निवेदनही याच महिन्यातील. फाशी झाली २३ मार्च ला... म्हणून तो शहीद दिन.. असा हा क्रांतिकारी महिना..

८ ऑगस्ट १९४२ ला कुसुमाग्रज यांनी पुण्यातील ‘प्रभात’ दैनिकात ‘गर्जा जयजयकार’ ही कविता लिहिली... ९ ऑगस्ट १९४२ ला ती प्रसिद्ध झाली. पुण्याचे पोलीस ‘प्रभात’  दैनिकाच्या कार्यालयात आले. ‘कोण कुसुमाग्रज’? संपादक खात्याचे दप्तर तपासले... त्यात ‘कुसुमाग्रज’ हे नावच नाही... वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज हे पोलिसांना माहितीच नव्हते. तात्यांनीच ही गंमत सांगितली आहे. ती त्यांची कविता त्यावेळच्या तरुणांना प्रचंड धैर्य आणि स्फूर्ती देवून गेली. आजही ती कविता अमर कविता मानली जाते. असा हा ९ अॅगस्ट आठवला की, अंगावर काटा येतो. 

८ ऑगस्ट सारे पुढारी तुरुंगात कोंबून ठेवलेले. ब्रिटीश पोलिसांना वाटले की, आता झेंडा कोण फडकवणार? ... आणि २० वर्षांची तरुणी अरुणा असफ अली तीरासारखी धावली...  ध्वजस्तंभावर सरसर चढली... तिने झेंडा फडकवला... वरून उडी मारली... तिला लाथा-बुक्यांनी पोलिसांनी बडवले... पण झेंडा फडकला. असा हा क्रांतिकारी महिना... नवीन  पिढीला हा इितहास सांगितला पाहिजे. कारण तो इितहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. सर्व देशभर त्या दिवशी घुमलेला ‘चले जाव...’ हा शब्द... या शब्दामागे एक राजकीय चारित्र्य होते... देशभक्ती होती.. निर्धार होता.. शहरं सोडली तर देशात वीज नव्हती.... फोन नव्हते... फॅक्स नव्हते... मोबाईल नव्हते... सगळ्या भौतिक प्रगतीपासून दूर असलेला देश. संध्याकाळी ७ वाजले की, अंधारात डुबून जाणारा ग्रामीण भारत त्या देशाला महात्मा गांधी यांच्या रूपाने एक विलक्षण प्रकाश मिळाला होता. त्यामुळेच आंधळा डोळस झाला होता. पंगू असलेला चालू लागला... ‘मला देशासाठी काहीतरी करायचे आहे...’ या भावनेने सगळा देश आणि देशातील तरुण भारावून गेला होता. बाबू गेनू असेल... किंवा शिरीषकुमार असेल... यांच्या घरी महात्मा गांधी सांगायला गेले नव्हते... पण, या कोवळ्या जिवांनी भारलेल्या वातावरणातच स्वत:च्या प्राणाचे समर्पण केले. राजकीय चारित्र्यावर उभी असलेली त्यावेळच्या नेत्यांची ती पिढी आणि ते नेते... महात्माजी असतील... पंडितजी असतील... सुधाषचंद्र बोस असतील... खान अब्दुल गफार खान असतील.. , मदन मोहम मालविया... राम मोहन लोहिया... अच्युतराव पटवर्धन, युसूफ मेहर अली.... ही सगळी नावं डोळ्यांसमोर आली की, तो काळ... ते वातावरण अंगावर रोमांच उभे करतात... शक्तीमान सत्तेविरुद्धची अजिंक्य मनांची लढाई या देशातील सामान्य माणसांनी जिंकून दिली.. ‘मला काही मिळवायचे आहे,’ ही भावना त्यावेळी कोणाच्याही मनात नव्हती... जगाच्या इितहासात असा एक देश दाखवा... जो दोन शब्दांनी स्वतंत्र झालेला आहे.. ‘चले-जाव’ या शब्दात ते अफाट सामर्थ्य होते. फक्त दोनच शब्द... ‘चले-जाव..’, ‘छोडो-भारत’ ‘जय-हिंद’ ‘चलो दिल्ली...’ ९ ऑगस्टच्या क्रांतीची ही ज्योत सामान्य माणसांच्या मनात याच चळवळीने पेटवली. स्वातंत्र्याचा असा लढा जगात कोणत्याही देशात झालेला नाही... त्या चळवळीतील साधी-साधी माणसं किती तेजस्वी आणि किती आदर्श होती ... 

आज हे सगळे आठवताना एक खंत मनामध्ये येते... स्वातंत्र्यानंतरच्या दोन- तीन पिढ्या आणि त्यानंतरच्या पिढीमध्ये किती अंतर पडत गेले आहे... संस्कृतिचे आणि चरित्र्याचेही देशाच्या स्वातंत्र्याचा लढा काय होता, हे तरुण पिढीला आपण सांगितलेही नाही. या पिढीला भलतिकडे घेवून जाणारी एक वेगळी पिढी तयार झालेली आहे. १९४७ साली ३० कोटी लोकसंख्येचा असलेला देश आज जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला. आज मोठ मोठ्या घोषणा होत आहेत... पण, सामान्य माणसांचे प्रश्न आहेत तिथेच आहेत. आजही काळोख पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला शौचाला बसणाऱ्या महिलांची संख्या लाखांच्या घरात आहे. आणि डोक्यावर हंडा घेवून पाण्यासाठी वणवण करण्याऱ्या भगिनींचे हालही कमी झाले नाहीत. जगात भारताच्या विकासाची चर्चा आहे, असे सांगण्यात येत आहे... असेल पण व्यवहारात काय आहे? महागाई कुठुन कुठे गेली? शेतकर्याच्या नावावर सहा हजार रुपये चढवले आणि गॅसच्या किमती चौपट करून काढून घेतले. महागाई, बेरोजगारी, खेड्यांची धूप, न परवडणारी शेती, पैशाच्या हव्यासापायी पर्यावरणाचा होणारा नाश या सगळ्याच गोष्टी चिंताजनक असताना, नसलेल्या प्रश्नांची आज आपण देशात चर्चा करत आहोत... जे प्रश्न लोकांचे नाहीत तेच प्रश्न उचकवले जात आहेत.  औरंगजेब स्टेटस, ज्ञाानव्यापी हे नसलेले प्रश्न दिवस-दिवस वाहिन्या कवटाळून बसलेल्या आहेत. कामगार, शेतकरी, यांच्या प्रश्नांना जागा कुठे आहे? आधुनिक वाहिन्यांच्या कार्यक्रमांतून सामान्य माणसांच्या प्रश्नांना जागा नाही. 

जात- धर्माच्या नावावर जास्तीत जास्त भांडणे कशी लावता येतील आणि धार्मिक उन्माद कसा वाढवता येईल, याचे होणारे प्रयत्न आणि दुसरीकडे गरीब माणसांच्या प्रश्नाकडे लक्ष न देण्याची बेफिकीरी... चटक आणि चंगळवादाकडे खर्च होणारा पैसा... या सर्व गंभीर प्रश्नांत वृत्तपत्रांची जाहिरातींसाठी झालेली स्पर्धा.... सगळेच वातावरण गोंधळाचे झालेले आहे. देशाच्या मुख्य प्रश्नावर चर्चा न होता... विधानमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये गदारोळ आणि गोंधळ किती वर्ष आणि किती काळ चालला? कोणत्या प्रश्नांसाठी झाला? त्यासाठी किती पैसा खर्च झाला... वृत्तपत्रांचे किती काॅलम निरर्थकपणे खर्च पडले....? देशाच्या हिताचे त्यात किती होते? काय शिल्लक राहिले? माणमाणसांत गरीब-श्रीमंतीची भिंत वाढत चालली आहे. ‘पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो,’ असा एक धटींगणपणा समाजात अलगदपणे अवतरत आहे. संध्याकाळच्या वेळेला दारूच्या दुकानांवर तरुणांची गर्दी पाहून आपण नेमके कुठे चाललो आहोत, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. एकीकडे आधुनिकीकरण आणि दुसरीकडे स्पर्धात्मक जगात ग्रामीण विद्यार्थ्यांची होणारी घुसमट त्यामुळे त्याचे भविष्य अंधकारमय वाटत आहे... राजकीय चर्चा होत राहतील... ज्या काळात भौतिक सुधारणा नव्हत्या त्या काळातील घराघराने जपलेली मन:शांती आज हरवल्यासारखी दिसत आहे. जाती-धर्मांत वाढणारा विखार या सुंदर देशामध्ये राजकारण्यांनी निर्माण केलेला चिखल... कोणाकडे पहायचे... आणि या परिस्थितीतून मार्ग काढणारा कोण? सगळ्यांचीच विश्वासार्हता संपली. ८१ वर्षांपूर्वीचा ‘चले-जाव’ चा नारा आज पुन्हा एकदा घुमला तर.. समाजाला आपण त्यातून काय सांगणार? ८० वर्षांपूर्वीचे ते वातावरण आज देशात नाही. त्याग, सेवा आणि समर्पण हे शब्द बाद झालेले आहेत. 

ध्येयवादी माणसांची टिंगल होत आहे. प्रामाणिक माणसांना जगणे अशक्य केले जात आहेत. पैसेवाल्यांची चलती आहे. आणि सामान्य माणूस प्रत्येक ठिकाणच्या रांगेत अधांतरी उभा असल्यासारखा आहे... या स्थितीत ८० वर्षांपूर्वी ज्या प्रचंड निर्धाराने ऑगस्ट क्रांती दिनाचा जयजयकार झाला आज तो सगळा उत्साह संपला आहे. ‘स्वातंत्र्य दिन’ हा सुटीचा दिवस म्हणून साजरा होतोय... यंदा मंगळवारी स्वातंत्र्य दिन आला आहे.. एका हॉटेलात बसलेले चौघेजण चर्चा करत होते की, ‘अरे १५  ऑगस्ट मंगळवारी आहे... शनिवार रविवार सुटी... सोमवारी दांडी... मंगळवारी स्वातंत्र्यदिनाची सुटी... चार दिवस चला महाबळेश्वरला जावू...’ स्वातंत्र्य दिनाचा दिवस हा देशभक्तीच्या भावनांनी भारावलेला दिवस वाटेनासा झालेला आहे. भ्रमंतीचा दिवस झाला आहे... मजेचा दिवस झाला आहे... आपण कुठून निघालो होतो... आणि आता कुठे चाललो आहोत... प्रश्न प्रचंड आहेत... आणि कोणत्याच प्रश्नाचे उत्तर सामान्य माणसाला सहजपणे मिळत नाही. ज्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे अशांना कोणत्याच प्रश्नांची चिंता नाही. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर ५०-६० वर्षांतील हाच मोठा  चिंताजनक फरक आहे. 

सध्या एवढेच 📞9892033458

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.