राहुल गांधींनी देशाला जादूचा फ्लाईंग किस दिलायं - संजय राऊत
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेच्या आवारात फ्लाइंग किस दिल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी स्त्रियांचा अपमान केलेला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. यानंतर भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी देशाला जादूचा फ्लाईंग किस दिला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, “भारतीय जनता पक्ष कोणत्या गोष्टीचं कधी राजकारण करेल काही सांगता येत नाही. महिला कुस्तीपटू जंतर-मंतरला जेव्हा आंदोलन करत होत्या, तेव्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कुणी गेलं नाही. राहुल गांधींनी द्वेष, बदला यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा फ्लाईंग किस दिला आहे.
आपण जसं जादू की झप्पी म्हणतो, तसं राहुल गांधींनी देशाला जादूचा किस दिला आहे. राहुल गांधींनी देशात प्रेमाचं दुकान उघडलं आहे आणि फ्लाईंग किस या प्रेमाच्या दुकानातील महत्त्वाचं शस्त्र आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी अनेकदा फ्लाईंग किस दिले आहेत. मात्र, ज्यांना ममत्व आणि प्रेमाची सवय राहिलेली नाही, त्यांना प्रेमाचा फ्लाईंग किस म्हणजे काय कळणार नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही विश्वास ठराव का मांडला? हे देशाला चांगल्या प्रकारे माहित आहे. मणिपूरमध्ये घडत असलेल्या हिंसाचारावरून आम्ही हा ठराव मांडला आहे. कारण देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये येऊन या मुद्द्यावर बोलायला तयार नाही.
पंतप्रधान आणि सरकारची भूमिका समजून सांगायला ही लोकं तयार नाही. त्यामुळं नाईलाज म्हणून आम्ही हा ठराव मांडला आहे. गेल्या 40 वर्षात काय झालं ते आम्हाला सांगू नका. पण गेल्या 10 वर्षात काय घडलं? त्याचं उत्तर आम्हाला हवं आहे. मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळेवर भाष्य केलं असतं तर अविश्वास ठराव मांडण्याची गरज पडली नसती.”
“या देशामध्ये ईडीच्या माध्यमातून दहशत निर्माण केली आहे. ज्या गोष्टींचा सामान्य पोलीस तपास करू शकतात, ज्या गोष्टींचा तपास राज्यातील आर्थिक गुन्हे शाखा करू शकते, त्या गोष्टींचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा करत आहे. ईडी आणि अनेक प्रकारच्या केंद्रीय तपास यंत्रणा दहशतवाद वाढवत आहे. हे मी नाही, तर ज्येष्ठ कायदे पंडित हरीश साळवी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं आहे”, असही ते यावेळी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.