निःशुल्क उपचार नाकारल्यास तक्रारीसाठी १०४ टोल फ्री क्रमांक
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्याच्या अखत्यारीतील रुग्णालये, आरोग्य केंद्रात १५ ऑगस्टपासून निःशुल्क आरोग्य सेवा दिली जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विभागाने जिल्हा आणि तालुकास्तरावर संनियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य सेवेसाठी शुल्क आकारणाऱ्या संस्थांविरोधात १०४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारेच या सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे. बाह्यरुग्ण विभागामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना बाहेरून औषषे खरेदी करण्याकरिता चिठ्ठी देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयाची योग्य अंमलबजावणी न केल्यास तक्रार करण्यासाठी १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या तक्रारींचे निवारण करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्था प्रमुखांवर देण्यात आली आहे. तसेच निःशुल्क आरोग्यसेवेच्या निर्णयाची देखरेख करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर संनियत्रण, समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर सहा सदस्यांची समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. तालुका स्तरावर वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. दर महिन्याला या समितीची बैठक आयोजित करून यासंदर्भात आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.