नशेची औषधे विना डॉक्टर प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री केल्यास कारवाई - सहाय्यक आयुक्त (औषधे) एस.एस. घुणकीकर-कुप्पेकर
सांगली दि. 9 : नशेच्या औषधांची विक्री विना डॉक्टर प्रिस्क्रीप्शनशिवाय व विना विक्री बिलाने केल्याचे आढळून आल्यास व सदर औषधांचा वापर नशेकरिता होत असल्याचे निदर्शनास आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियमाअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त (औषधे) एस.एस. घुणकीकर-कुप्पेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
सांगली जिल्ह्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेते धारकांनी नशेची औषधे विक्री करतांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. नशेच्या औषधाची मागणी करणारा रुग्ण हा आरोपी पार्श्वभूमीचा आढळून आल्यास अथवा सदर औषधाची मागणी करताना रुग्ण संशयास्पद वाटल्यास त्याबाबतची माहिती नजिकच्या पोलीस कार्यालयास द्यावी. सर्व औषध विक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा हा समोरच्या बाजूस लावावा जेणेकरुन रुग्णांचा चेहरा स्पष्ट दिसू शकेल. शहरात युवा पिढीमध्ये नशेच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामध्ये अल्पवयीन मुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 18 वर्षाखालील व्यक्तीस नशेच्या औषधांची विक्री करु नये. जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेने किरकोळ विक्रेत्याकडून करण्यात येणाऱ्या नशेच्या औषधांच्या विक्रीवर लक्ष ठेवावे व नशेच्या औषधाच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ आढळून आल्यास अन्न व औषध विभागास त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (औषधे) एस.एस. घुणकीकर-कुप्पेकर यांनी केले आहे.
काही आजारांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीवर झोपेच्या गोळ्या देण्यात येतात. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर झोप येते. परंतु झोपेच्या गोळ्यांचा वापर नशा करण्याकरिता होत असल्याची व जिल्ह्यात नशेचे औषध विना डॉक्टर प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री केली जात असल्याबाबतची माहिती पोलिसांकडून अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयास मिळाली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक रा. सु. करंडे यांनी सांगली जिल्ह्यातील किरकोळ औषध विक्रेते यांची नशेच्या औषधांची विक्री विना डॉक्टर प्रिस्क्रीप्शनशिवाय संदर्भात पोलिसासमवेत संयुक्त तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली. परंतु या मोहिमेमध्ये अशा प्रकारे विना डॉक्टर प्रिक्रिप्शनशिवाय नशेच्या औषधांची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आली नाही. तथापि अचानक तपासणीवेळी मिरज तालुक्यात एका किरकोळ औषध विक्रेता पेढीकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीने देण्यात येणाऱ्या झोपेच्या गोळ्यांची विक्री विना डॉक्टर प्रिस्क्रीप्शनशिवाय विना विक्री बिलाने केली जात असल्याची बाब निदर्शनास आली. किरकोळ औषध विक्रेता पेढीने गुंगीकारक औषधाची विक्री विना डॉक्टर प्रिस्क्रीप्शनशिवाय विना विक्री बिलाने केल्याने सदर किरकोळ औषध विक्रेते धारकाचे परवाने निलंबित करण्यात आलेले असल्याचे सहाय्यक आयुक्त (औषधे) एस.एस. घुणकीकर-कुप्पेकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.