सांगली : गुरूवारी रात्रीची वेळ आणि पोलीसांना दूरध्वनीवरून कुपवाडमधील एका कारखाना परिसरात खून झाल्याची माहिती मिळाली. मात्र, रात्रभर शोधूनही घटनास्थळी काहीच आढळले नाही. ज्या भ्रमणध्वनीवरून माहिती मिळाली त्याचा शोध घेतला असता मद्याच्या अंमलाखाली त्यांने ही माहिती दिली असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी सुटकेचा निश्वास टाकत असतानाच मद्यपींचा योग्य तो पाहुणचार करीत औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला
नागरिकांना तात्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी डायल ११२ हा नंबर देण्यात आला आहे. गुरूवारी रात्री या फोनवर कुपवाडमधील सुपर क्रॉप्ट कारखान्याजवळ एकाचा खून झाल्याची माहिती मिळताच ही माहिती मुख्यालयातून तात्काळ मिरज व औद्योगिक पोलीस ठाण्यात देण्यात आली. दोन्ही पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावले. मात्र, या कारखाना परिसरात काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. ज्या भ्रमणध्वनीवरून हा संदेश आला होता, त्याच नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात आला होता. पोलीसांनी शोधाशोध केली असता एक तरूण दारूच्या नशेत पडल्याचे आढळले.
या मद्यपी तरूणाची चौकशी केली असता त्यांने हा संदेश आपणच दिल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याचा यथेच्छ पाहुणचार करून गुन्हाही दाखल केला. या तरूणाचे नाव सुदीप धुपेंद्रसिंह पटेल (वय ३६, रा. सुपर क्रॉप्ट, मूळ गाव गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.