Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड; राज्यातील दुसराच प्रयोग

ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड; राज्यातील दुसराच प्रयोग 


पुणे : तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात  आणण्यासाठी पुण्यात वेगवेगळ्या उपाययोजना सुरु करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेची सुरक्षा 10 तृतीयपंथीयांच्या हाती सोपवल्यानंतर आता पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात तृतीयपंथीय रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड सुरु करण्यात आलं आहे. यामुळे आता ससून रुग्णालायात तृतीयपंथीयांना उपचार घेणं सोपं आणि सुरक्षित होणार आहे. 

या वॉर्डमध्ये 24 बेड आणि दोन अतिरिक्त ICU बेड आहेत. मागील काही दिवसांपासून तृतीयपंथीयांना अनेक आरोग्याच्या समस्या जाणवत असल्याचं समोर आलं होतं. त्यात अनेकदा रुग्णालयात असा स्पेशल वॉर्ड नसल्यामुळे उपचार करण्यासाठी आणि तृतीयपंथीयांना उपचार घेण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या स्पेशल वॉर्डचं अनावरण करण्यात आलं आहे. 

यापूर्वी मुंबईतील सरकारी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात असाच एक वॉर्ड सुरु करण्यात आला होता. तो महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. राज्यभर सुविधेचा विस्तार करण्यासाठी सरकारने समुदायातील सदस्यांना त्यांच्या सूचना आणि अभिप्राय शेअर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आता पुण्यातील ससून रुग्णालयात स्पेशल वॉर्ड सुरु करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तृतीयपंथीयांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या स्पेशल वॉर्डची गरज आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तृतीयपंथीयांसाठी असा वेगळा वॉर्ड असेल अशी अपेक्षा आहे. यामुळे तृतीयपंथीयांना सामान्यांच्या रांगेत आणण्यासाठी मोठी मदत होणार आहे. 

महापालिकेची सुरक्षा तृतीपंथीयांच्या हाती....

पुणे महापालिकेने सुरक्षारक्षक  म्हणून दहा तृतीयपंथीयांना  नोकरीची संधी उपलब्ध करुन द्यायचं ठरवलं आहे. तृतीयपंथीयांबद्दलच्या दृष्टिकोनात बदल व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारी तनुश्री भोसले ही काही दिवसांपूर्वी शुभम भोसले होती. पण पुढचं आयुष्य तृतीयपंथी म्हणून जगायचं तिनं ठरवलं आणि लिंगबदलाची शस्त्रक्रिया करुन ती पुरुषाची स्त्री बनली. पण पुढे नोकरीचं काय असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिचा हा प्रश्न पुणे महापालिकेने सोडवला आहे. तिच्यासारख्या दहा तृतीयपंथीयांना सुरक्षारक्षक म्हणून काम द्यायचं पुणे महापालिकेने ठरवलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.