सागंली- मिरजेतील शासकीय रुग्णालय ' वाऱ्यावर 'डॉक्टरांची कमतरता, अनेक पदे रिक्त
सांगली: कर्नाटकासह जिल्ह्यातील गोरगरीबांना वरदान ठरलेल्या सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. रुग्णालयात रामभरोसे कारभार सुरू आहे.
ठाणे येथील घटनेचा बोध घेऊन रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे.
सांगली, मिरज सिव्हिल ७१० बेडचे आहे. या रुग्णालयात दररोज ८०० ते ८५० रुग्ण उपचारासाठी येतात. दोन्ही रुग्णालयातील प्रसुती, मेडिसिन, ऑर्थो व सर्जरी विभाग २४ तास कार्यरत असतात. सांगलीच्या प्रसुती विभागात महिन्याला ८०० ते ९०० महिला उपचारासाठी येतात. तेथे फक्त दोनच तज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. दोन्ही रुग्णालयातील प्रमुख पद रिक्त आहे. मेडिसिन विभागात महिन्याला अडीच ते तीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णालयातआयसीयू फुल्ल असतो. एक बेड सुद्धा रिकामा नसतो.तिथे २८ डाॅक्टरांची गरज आहे. प्रत्यक्षात सात डाॅक्टरच कार्यरत आहेत. ०या विभागात वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे. ऑर्थो विभागात महिन्याला लहान व मोठया १७०० ते दोन हजार सर्जरी होतात. जवळपास ६० लाख ते ७० लाख रुपयांचे नविन सर्जरीचे साहित्य उपलब्ध आहे. परंतू ते साहित्य वापरणाऱ्या तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. येथेही तीनच डॉक्टर काम करत आहेत. अजून १५ डॉक्टरांची कमतरता आहे. सर्जरी विभागात २१ डाॅक्टरांची गरज असताना केवळ पाच डाॅक्टर उपलब्ध आहेत. याशिवाय नर्सिंग स्टाफ, वर्ग ३ व ४ चे ३५ टक्के कर्मचारी कमी आहेत. यामुळे फार मोठा ताण रुग्णालयावर पडत आहे.
जयंतरावांना निवेदन
सांगली, मिरज रुग्णालयातील दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा, समीर कुपवाडे, उमर गवंडी, युसूफ जमादार, मुन्ना शेख, शहानवाज फकीर, सरफराज शेख, साहील मगदूम यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सिव्हिलमधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.