Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यास गतीने तपासणी मोहिम राबवा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यास गतीने तपासणी मोहिम राबवा  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

सांगली,  :-  वैद्यकीय व्यवसाय हा जनतेच्या आरोग्याशी निगडित असल्याने बोगस वैद्यकीय व्यवसायांकाविरुद्ध तपासणी मोहिम अधिक गतीने राबवा, याबाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करा, दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करा, आणि केलेल्या कारवाईचा अहवाल समितीस तातडीने सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले.

बोगस वैद्यकीय व्यवसायांकाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गठित जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, नगर प्रशासन विभागाचे सहाय्यक  आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह  समिती सदस्य व संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर बोगस वैद्यकीय व्यवसायिकांची तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी त्या-त्या कार्यक्षेत्रात असलेल्या यंत्रणांनी याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. बोगस वैद्यकीय व्यवसायिकांमुळे जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी अशा व्यवसायांकाविरुद्ध कडक कारवाई करावी. 

या बैठकीत बोगस वैद्यकीय व्यवसायांकाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला. दाखल करण्यात आलेल्या १२८ गुन्ह्यांपैकी शाबीत गुन्हे २२, सुटलेले गुन्हे ५८, कोर्ट पेंडिग गुन्हे ३४, काढून टाकलेले गुन्हे ४,  अबेट समरी २ गुन्हे, अ फायनल २ गुन्हे,  क फायनल १ गुन्हा व कायम तपासावर ५ गुन्हे असल्याची माहिती बैठकीस पोलीस विभागामार्फत देण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.