प्रिय ताई... प्रतिभाताई...
राखी पौर्णिमा जवळ आली की, प्रतिभाताईंची प्रेमळ राखी डोळ्यांसमोर येते. माझे आई-वडील फार पूर्वीच गेले. माझ्या तिन्ही सख्ख्या बहिणीही स्वर्गवासी झाल्या. त्यांचे पतीही गेले. आई जाऊन तर ६० वर्षे झाली. ती शिकली नव्हती. पण न शिकलेल्या आईने आम्हा चारही भावंडांना खूप काही शिकवले. संस्कार बाहेरून होत नाहीत. घरातच होतात. माझी मोठी मुलगी कॅन्सर आजाराने गेली त्यालाही आता ४५ वर्षे होवून गेली. अवघ्या १२ व्या वर्षी ती गेली. तिला वाचवू शकलो नाही, हे दु:ख आयुष्यभर सलत आहे. पत्नी मंगलाही जाऊन तीन वर्षे झाली. मंगला उस्मानीया विद्यापीठाची उच्च विद्याविभूषित होती. माझी दुसरी मुलगी डॉ. मृदुला एम.बी.बी.एस. एम. एस, एफ. आर. सी. एस. आहे. आणि घरी अभ्यास करून एम. बी. ए. झाली. ती नेत्र विशारद आहे. तसं म्हटलं तर आता मी एकटाच आहे. काळजी घ्यायला मृदुला आहे. ती माझी पूर्ण काळजी घेते. पण, डॉ. मृदुला दिवसभर तिच्या हॉस्िपटलच्या कामात आणि मी माझ्या कामात. कामात बडवून घेतल्याशिवाय एकाकीपण सुसह्य होत नाही. वाचन आणि काम हे सर्वात चांगले मित्र. त्याचा अनुभव अनेकवर्षे करतो आहे. प्रवास करतानाही तोच आनंद होतो. अनेक गोष्टी आजही शिकता येतात. शिवाय आयुष्यात सभोवती कितीही गर्दी असली... अगदी चर्चगेट स्टेशन किंवा सी. एस. टी च्या गर्दीतसुद्धा, प्रत्येकजण तसा एकटा-एकटा आणि सुटा-सुटाच असतो. त्या सर्वांची मिळूनच गर्दी होते. अशावेळी एकटेपणात दरवर्षी ‘राखी’ आणि ‘भाऊबीज’ या पवित्र दिवशी अगदी प्रेमाने मारलेली ‘मधुभाऊ’ प्रतिभाताईंची हाक मला वर्षभर जगण्याचे बळ देत आली आहे.
८८ व्या वर्षी अत्यंत प्रेमाने मला ‘मधुभाऊ’ म्हणण्ााऱ्या ताईसाहेब म्हणजेच भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. त्या फार मोठ्या पदांवर होत्या. म्हणून त्यांची ‘मधुभाऊ’ ही हाक मोठी नाही. त्या कोणत्याही पदावर नव्हत्या, त्या सात-आठ वर्षांतसुद्धा, तीच प्रेमळ हाक होती. त्या मनानेही खूप मोठ्या आहेत. पण, त्यांचा प्रवास सोपा नव्हता. काहीवेळा मी विचार करत असतो... राजकीय पत्रकारिता करताना अनेकांच्या भेटी झाल्या, चर्चा झाल्या.. मैत्री झाली... स्नेह घट्ट झाला... पण, फार थोडी राजकीय माणसं अशी असतात, जी जीव लावतात... आयुष्यभर हे संबंध जपतात. त्या संबंधात कुठेही ओरखडा येत नाही. आमच्या प्रतिभाताईंनी हे नाते किती वर्षे जपले आणि मी अगदी छोटा आणि अगदी सामान्य पत्रकार असतानाही...
आज ६२ वर्षे मागे गेलो. जुने विधानभवन समोर आले. यशवंतराव चव्हाणसाहेब त्यावेळी मुख्यमंत्रीपदी... प्रतिभाताई त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्या. उच्च विद्याविभूषित... त्यांचे वडील नानासाहेब पाटील आणि त्यांच्या मातोश्री या दोघांची ताईंना सक्त ताकीद... ‘तू खूप शिकले पाहिजेस....’ ताई दहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या मातोश्री गेल्या. त्यांच्या मावशीने त्यांना वाढवले. पण, आई-वडिलांचा शब्द मनाशी ठेवून ताई राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यामध्ये एम.ए./एम.ए. झाल्या. कायद्याची एल. एल. बी. ही पदवी मिळवली. महाराष्ट्र विधानसभेत त्या आल्या तेव्हा महिला आमदारांची संख्या फारच कमी होती. कुसूमताई कोरपे, डॉ. अंजनाताई मगर या १९५७ ते १९६२ या काळात.... नंतर प्रतिभाताई, विमलताई रांगणेकर, निर्मलाताई ठाेकळ, विरोधी बाकावर मृणालताई गोरे, कुसूमताई अभ्यंकर या सर्व महिला आमदारांमध्ये प्रतिभाताई अगदी आगळ्या-वेगळ्या आणि कुठून कुठे पोहोचल्या.
त्या लहान होत्या तेव्हा त्यांच्या गावी कलेक्टर येणार होते.. त्यांनी वडीलांना बालवयात सुलभ असलेला प्रश्न उत्सुकतेने विचारला.... ‘बाबा, कलेक्टर मोठा की, राज्यपाल...?’ नानासाहेब म्हणाले, ‘अगं बेबी, राज्यपाल मोठा....’ आणि त्याच सहजतेने प्रतिभाताई म्हणून गेल्या की, ‘मग मी राज्यपाल होईन....’ आणि ज्या दिवशी (८ नोव्हेंबर २००४) रोजी त्यांनी राजस्थानच्या राज्यपालपदाची शपथ घेतली तेव्हा, त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे बाबा नानासाहेब आले होते आणि नकळत डोळ्यांत अश्रू तरळले. त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की, राजस्थानच्या राज्यपालपदावरून आपल्याला राष्ट्रपती भवनपर्यंत पोहोचायचे आहे. जेव्हा २००७ च्या राष्ट्रपती उमेदवाराची चर्चा सुरू झाली त्यावेळच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. सोिनया गांधी या अध्यक्ष होत्या. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्या सरकारचे घटकपक्ष असलेले सर्व सदस्य बैठकीला होते. कम्युनिस्ट नेते कॉम्रेड बर्धन यांनी सुचवले की, आपण राष्ट्रपती पदासाठी एखाद्या महिलेचा विचार का करू नये,.... सोनिया गांधी म्हणाल्या ‘सूचना चांगली आहे... पण, नाव सूचवा....’ लगेच बर्धन म्हणाले की, ‘राजस्थानच्या राज्यपाल प्रतिभाताई या चांगल्या उमेदवार होऊ शकतील.... श्री. शरद पवारसाहेब यांनी प्रतिभाताई हे नाव लगेच उचलून धरले. आणि क्षणात नावाला मान्यता मिळाली. ताबडतोब पवारसाहेबांनीच प्रतिभाताईंना फोन केला. त्या फोनवर म्हणाल्या ‘ओ... माय गॅाड...’ आणि प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या.... राष्ट्रपती झाल्यावर पहिल्यांदा अमरावतीला त्यांच्या गावी गेल्या. लाखो लोक स्वागताला जमले होते. लोकं घोषणा देत होते, ‘प्रतिभाताई, आगे बढो... हम तुम्हारे साथ हैं....’ प्रतिभाताई म्हणाल्या, ‘मै इतनी आगे बढ चुकी हँू.... अपने देश में उसके आगे कुछ नहीं हैं...’ आणि खरोखरच एक मराठी भगिनी या जागेपर्यंत पोहाचली त्याचा आनंद महाराष्ट्राला निश्चितच झाला. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शेिवसेना तेव्हा भाजपासोबत होती. पण, प्रतिभाताईंना उमेदवारी मिळाल्यावर बाळासाहेब ताडकन म्हणाले, ‘शिवसेना आमदारांची आणि खासदारांची सगळी मते आमच्या प्रतिभाताईंना....’ काँग्रेस आणि शिवसेनेची पहिली आघाडी २००७ ला अशाप्रकारे झाली होती...
ताई १९६२ साली आमदार, मग उपमंत्री, मग कॅबिनेट मंत्री, मग १९७८ साली विरोधी पक्षनेत्या. मग अमरावीतच्या खासदार, मग राज्यसभेत खासदार, मग राज्यसभेच्या उपाध्यक्षा, मग राजस्थानच्या राज्यपाल आणि सरतेशेवटी २५ जुलै २००७ ला देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती... केवढा मोठा प्रवास.... आणि एवढ्या ५०-५५ वर्षांच्या राजकारणात एकही ओरखडा नाही. डोक्यावरचा पदर ढळला नाही. पदरात निखारा घेवून चालताना ताईंचा पदर कधी पेटला नाही आणि निखाराही कधी विझला नाही. एकाही निवडणुकीत त्यांनी कधी पराभव पत्करला नाही. देवघरात शांतपणे तेवणारा नंदादीप म्हणजे प्रतिभाताई.
त्यांच्याच जिल्ह्यातील फार मोठे मधुकरराव चौधरी हे ताईंना जेष्ठ. १९५७ च्या वादळात ते निवडून आले. यशवंतरावांनी त्यांना लगेच मंत्रिमंडळात घेतले. तेही गांधीवादी विचारांचे. तेही महसूलमंत्री, अर्थमंत्री आणि महाराष्ट्राच्या कायमचे लक्षात राहिले ते शिक्षणमंत्री म्हणून... प्रतिभाताईंशी त्यांचे नाते कधीच स्पर्धेचे नव्हते... उलट भावा-बहिणीचेच होते...
अशा या प्रतिभाताई.... प्रतिभाताईंनी १९६२ च्या मार्च महिन्यात ‘मधुभाऊ’ अशी हाक मारून मला विधानमंडळाच्या लॉबीत बोलावले... विषय असा झाला होता की, विधानमंडळात १९६२ सालच्या पहिल्याच अधिवेशनात महाराष्ट्र-म्हैसूर सीमा प्रश्नावर (तेव्हा सीमाप्रश्नाला म्हैसूर प्रश्न म्हटले जात असे...) आता जो बेळगाव-कारवारचा लढा चालू आहे तेव्हापासूनचा हा प्रश्न आहे. विरोधकांनी गदारोळ केला... ‘सीमाप्रश्न कधी सुटणार...’ यशवंतराव सांगत होते, ‘म्हैसूर सरकारशी आमच्या वाटाघाटी चालू आहेत....’ ‘वाटाघाटी’ हा शब्द त्यांनी चार-पाच वेळा उच्चारला... शेवटच्या बाकावर बसलेल्या प्रतिभाताईंनी हात वर करून अगदी हळूवारपणे अध्यक्षांना म्हटले, ‘अध्यक्ष महाराज, मला एक प्रश्न विचारायचा आहे....’ त्यांचा प्रश्न होता ‘माननीय मुख्यमंत्री चार-पाच वेळा ‘वाटा-घाटी’ चालू असल्याचे सांगत आहेत... या वाटाघाटीत वाटा कुणाला मिळणार आणि घाटा कोणाचा होणार?’ त्या टोकदार प्रश्नाने यशवंतराव चव्हाण यांनी वळून क्षणभर मागे पाहिले... त्यांच्या टोकदार टोपीचा कोन पत्रकार कक्षातून माझ्या डोळ्यांसमोर आजही येतो.
ताईंचा तो प्रश्न ‘मराठा’ दैनिकात चौकट करून मी छापला. त्यांचा छोटा फोटोही टाकला. शिर्षक होते, ‘महिला आमदाराचा टोकदार प्रश्न... वाटा कोणाला मिळणार आणि घाटा कोणाचा होणार?’ ताईंची आणि माझी तेव्हा ओळख नव्हती... बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विधानभवनाच्या लॉबीत त्यांनी मला ‘मधुभाऊ’ म्हणून हाक मारली. ‘तुम्हीच ती बातमी दिली का?’ आणि त्या प्रश्नातूनच पुढच्या नात्याची सगळी उत्तरे मिळत गेली. ५० वर्षे ‘मधुभाऊ’ ही हाक अाजही कायम आहे. आणि त्याच टाेकदार प्रश्नाने आपल्याच पक्षाच्या आमदाराची संसदीय कुवत यशवंतरावांना जाणवली. ताई नंतर उपमंत्री झाल्या. त्यानंतर ताईंनी मागे वळून पाहिले नाही. २० वर्षे त्या मंत्री होत्या. अशा या ताईंनी ‘मधुभाऊ’ हे नातं आयुष्यभर जपलं. राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला किती उत्साहाने, प्रेमाने त्यांच्या घरचा सोहळा म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी धन्यता आहे.
यावर्षी ताईंचे पती देवीसिंग शेखावत साहेब नाहीत. शेखावत साहेबांचेही कर्तृत्त्व मोठे होेते... ते प्राध्यापक होते.. प्राचार्य होते... विज्ञाान विषयाचे मोठे अभ्यासक होते... अमरावतीचे पहिले महापौर होते... १९८५ ते १९९० विधानसभेचे अमरावती मतदारसंघाचे आमदार होते. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या पत्नीच्या राजकारणातील यशामागे ते ठामपणे उभे होते. सामान्यपणे असे होते की, पुरुषाच्या कर्तृत्त्वाचा झेंडा फडकत असतो... त्या झेंड्याची काठी त्याचा संसार करणारी अबोल पत्नी असते. इथं पत्नीचा झेंडा फडकत असताना शेखावतसाहेब पडद्यामागे राहून ताईंच्या फडकत्या झेंड्याची काठी होते. आज ते नाहीत. त्याचे दु:ख सर्वांनाच आहे. आणि उद्याच्या राखीबंधनाला ते जाणवणारच आहे. पण नियतीचा खेळ कोणाला थांबवता येत नाही.
आज ८८ व्या वर्षी शांतपणे जीवन जगत असलेल्या ताईंना राखीपौर्णिमेच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा! अजून १२ पायंड्या चढून त्यांच्या जन्मदिनाचे शतक १९ डिसेंबर २०३४ ला साजरे करायचे आहे. तिथपर्यंत ताईंना परमेश्वराने उत्तम आरोग्य द्यावे. त्यांनी आजपर्यंत बांधलेल्या राखीच्या प्रत्येक रेशमी धाग्याची हीच प्रार्थना. त्यांची काळजी घेणारी त्यांची सुकन्या ज्योतीताईलाही राखीच्या शुभेच्छा!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.