Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सेवा, सुविधा उपलब्ध करून देणार; मंत्री हसन मुश्रीफ

शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सेवा, सुविधा उपलब्ध करून देणार; मंत्री हसन मुश्रीफ 


राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात खासगी रूग्णालयाच्या तोडीची अत्याधुनिक सेवा उपलब्ध देण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई येथे उरः शल्यचिकित्साशास्त्र विभाग (कार्डिओ व्हॅस्कुलर थोरॅसिक सर्जरी) (सीव्हीटीएस) व कक्षाचे उद्घाटन श्री.मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी आमदार अमिन पटेल, श्रीमती यामिनी जाधव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सचिव डॉ.अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय सुरासे आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, शासकीय रूग्णालयात सर्व रूग्णांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्ण सेवा करणाऱ्या शासकीय डॉक्टरांसह त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान आणि वसतिगृहासह चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

शासकीय रूग्णालयात चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याने खाटा कमी पडत आहेत. प्रत्येक शासकीय रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता कक्षांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ज्या रुग्णालयात कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असेही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी सांगितले. सीव्हीटीएस कक्षाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 4.94 कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीचे त्यांनी आभार मानले. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जननीशिशु सुरक्षा योजना यासारख्या शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजू रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा योजना जास्तीत जास्त गरजूंना कशा मिळतील यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.