Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

येत्या 8 दिवसात दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांबाबत पूर्तता न झाल्यास थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा

येत्या 8 दिवसात दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांबाबत पूर्तता न झाल्यास थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा


जत: येत्या 8 दिवसात दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांबाबत पूर्तता न झाल्यास थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी आज (बुधवार) राज्य सरकारला दिला. पाणी संघर्ष समितीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदाेलनाप्रसंगी दुष्काळग्रस्त पाण्यासाठी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.


सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात नसल्याचा आरोप करत पाणी संघर्ष समितीच्या वतीने आता पुन्हा आरपारची लढाई सुरू केली आहे.

राज्य सरकारने मंजूर केलेल्या विस्तारित म्हैशाळ सिंचन योजनेचे संपूर्ण टेंडरची प्रक्रिया पूर्ण करावी, त्याचबरोबर कर्नाटक राज्यातल्या तुबची बबलेश्वर योजनेतून सीमा भागातल्या गावांना पाणी देण्याबाबत पाऊल उचलावं, यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.

त्यामध्ये तालुक्यातील दुष्काळग्रस्त त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता. राज्य सरकारला पाणी संघर्ष समितीच्या वतीने आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. आठ दिवसांत राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत धोरण घेतलं नाही तर राज्य सरकारची कोणत्याही एनओसीची वाट न बघता थेट कर्नाटकात जाण्याची भूमिका पुन्हा जाहीर करण्यात आलेली आहे.

त्यासाठी जत तालुक्यातल्या 80 गावांमध्ये पदयात्रा काढून गावागावात जागृती करत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून कर्नाटकात जाण्याबाबतचा ठराव करण्यात येईल. त्याचबरोबर कर्नाटक राज्याच्या मंत्र्यांची भेट देखील घेणार असल्याचे पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.