टेलिग्रामवरून 7 कोटींची रक्कम केली फ्रिज ! इस्लामपूर आणि सांगली सायबर पोलिसांची कारवाई
सांगली : टेलिग्रामवर ऑनलाईन ट्रेडींगव्दारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या २१ लाख रुपयांचा शोध घेताना पोलिसांना फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील तब्बल सात कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात यश आले. सांगलीतील सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. 'कॅपिटालिक्स' नावाच्या ग्रुपवरून ट्रेडींग केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत इस्लामपूर येथील एकाला २१ लाख १० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता. ही रक्कम गोठविण्यात आली.
इस्लामपूर येथील हर्षवर्धन पाटील यांना कॅपिटालिक्स ग्रुपवरून चॅटींग करून ऑनलाईन ट्रेडींगबाबत माहिती देण्यात आली होती. ट्रेडींग करण्यासाठी वेगवेगळी २० बोगस बँक खाती त्यांना देण्यात आली होती. या खात्यावर त्यांनी २१ लाख १० हजार रुपयांची रक्कम पाठविली होती. यानंतर पाटील यांना परतावा मिळण्याची प्रतिक्षा होती. यानंतर संशयितांनी त्यांना गुंतवलेली रक्कम परत मिळविण्यासाठी कर म्हणून अजून १० लाख ८५ हजार ५०० रुपये गुंतवावे लागतील असे चॅटींगवरच सांगितले व त्यासाठी आणखी पाच बनावट खाती दिली होती.
या व्यवहाराबाबत पाटील यांना शंका आल्याने त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाणे व सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, संबंधितांची २७ बनावट खाती तपासण्यात आली. यात सर्व खात्यांवर मिळून तब्बल सात कोटी ८१ हजार रुपयांची रक्कम असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तातडीने ही सर्व खाती 'फ्रीज' करण्यात आली.
इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय हारुगडे, गणेश झांबरे, अरुण कानडे, पोशि सुशांत बुचडे, पोहेकॉ करण परदेशी, विवेक साळुंखे, इमान महालकरी, अजय पाटील, स्वप्नील नायकवडी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.