Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चटणीसाठी शिर्डीचे आचारी थेट राष्ट्रपती भवनात; रेसीपी शिकवण्यासाठी खास आमंत्रित

चटणीसाठी शिर्डीचे आचारी थेट राष्ट्रपती भवनात; रेसीपी शिकवण्यासाठी खास आमंत्रित 


शिर्डी : सामान्यांच्या ताटात नित्याची असणारी शेंगदाणा चटणी व सर्वसामान्यांचा आवडता वडा-पाव लवकरच राष्ट्रपतींच्या भोजनात समाविष्ट होणार आहे. या पदार्थांसह अन्य महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची रेसिपी शिकवण्यासाठी साई संस्थानच्या आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनात निमंत्रित केले आहे.

दि. ७ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साईदर्शनाच्या निमित्ताने शिर्डीत आल्या. त्यावेळी त्यांनी  साई संस्थानच्या प्रसादालयात भोजन केले. यात गावरान मटकी, मेथी, बटाटा भजी, डाळ, भात, चपाती,  बटाटे वडा, पाव, शिरा, बुंदीचा लाडू, तसेच विविध प्रकारच्या चटण्यांचा समावेश होता. राष्ट्रपतींना जेवण व त्यातील शेंगदाणा चटणी विशेष आवडली. 

जेवणानंतर त्यांच्या आचाऱ्यांनी चटणीची रेसिपी जाणून घेत सॅम्पलही बरोबर नेले होते. राष्ट्रपती भवनाकडून १५ पंधरा दिवसांसाठी संस्थानकडे आचाऱ्यांची मागणी केली. त्यानुसार पर्यवेक्षक प्रल्हाद कर्डिले व आचारी रवींद्र वहाडणे यांना दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेतला. दि. २९ जुलेला ते विमानाने दिल्लीला रवाना होत आहेत.

नवी ओळख 'शाही चटणी'

साई संस्थानच्या प्रसादालयात ५० रुपये आकारून देण्यात येणाऱ्या व्हीआयपी जेवणात या चटणीचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या पसंतीनंतर या चटणीची 'शाही चटणी' अशी नवी ओळख निर्माण होणार आहे. साईबाबांच्या द्वारकामाईतील न्याहरीच्या व समाधी मंदिरातील दुपारच्या नैवेद्यात या चटणीचा समावेश असतो.

आचारी शेतकरी कुटुंबातील

शेतकरी कुटुंबातील असलेला रवींद्र वहाडणे हा आचारी संस्थानात कंत्राटी आहे. दोघांच्या प्रवास निवासाची व्यवस्था दिल्लीतून करण्यात आली आहे. राष्ट्रपतींना भावलेल्या शेंगदाणा चटणीसारखे मराठमोळे पदार्थही यानिमित्ताने भारतभर रुजतील. आयएसओ मानांकन व सामान्य भाविकांसाठी विनामूल्य असलेल्या संस्थान प्रसादालयात वर्षाकाठी दीड ते पावणेदोन कोटी भाविक भोजन घेतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.