Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अलमट्टी धरणातून दीड लाख क्यूसेस विसर्ग; सांगली,कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील गावाचा धोका टळणार

अलमट्टी धरणातून दीड लाख क्यूसेस विसर्ग; सांगली,कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील गावाचा धोका टळणार 

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका होऊ नये यासाठी धरणातील पाणी साठ्यांचा विसर्ग होण्याची मोठी गरज असते. दरम्यान कर्नाटक राज्यात असणाऱ्या अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसतो. परंतू यंदा हा धोका टळण्याची शक्यता आहे. यंदा अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी झाली आहे.

आलमट्टी धरणातील पाणीसाठा व तेथील पाण्याच्या विसर्गावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष असते, तर महाराष्ट्रातील कोयना व अन्य धरणांतून होणाऱ्या विसर्गावर कर्नाटक पाटबंधारे विभाग लक्ष ठेवून असतो. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणातून जवळपास १० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे.

कृष्णेच्या उपनद्यांवरील धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे कोयना आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पाण्याचा थेट परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पिकांवर होतो. परंतु महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून योग्य पद्धतीने विसर्ग झाला तर महापुराचा धोका टाळता येतो. यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने परस्पर चांगला समन्वय ठेवला आहे.

दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे. धरण परिसरात होणारा पाऊस लक्षात घेता अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी ३० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता तो दुपारी १ वाजता ४२ हजार ५०० करण्यात आला. पुन्हा विसर्ग वाढण्यात आला आहे. दुपारी २ वाजल्यापासून ४२ हजार ५०० वरून तो ७५ हजार करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यामुळे अलमट्टी धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाणी पातळी नियंत्रणात राहण्यास मदत

महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा, विसर्ग व आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग यामध्ये समन्वय आहे. यामुळे कोयना आणि अलमट्टी धरण विभागातील अधिकाऱ्यामुळे पाणी पातळी नियंत्रणात राहण्यासा मदत होणार आहे. या समन्वयामुळे सुसूत्रता आल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याकडून आलमट्टी येथे एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.

२४ तासांत २० टीएमसी पाणीसाठा वाढला

अलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. सकाळी आठ वाजता धरणातील एकूण पाणीसाठा ७१.८१४ टीएमसी इतका होता, तर जिवंत पाणीसाठा ५४.१९४ टीएमसी इतका असल्याची माहिती कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. आलमट्टी धरणात ५३.२४९ टीएमसी पाणीसाठा होता. दोन दिवसांत पाणीसाठ्यात सुमारे २० टीएमसीने वाढ झाली आहे. आलमट्टी धरणाची क्षमता १२३.०८१ टीएमसी आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.