Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील बीआरएसच्या वाटेवर?

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील बीआरएसच्या वाटेवर?

सांगली : महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी भारत राष्ट्र समितीच्या विचारास पूरक राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगितले. भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याबाबत मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री राव हे उद्या कोल्हापूर व सांगली दौर्‍यावर येत असून सांगलीमध्ये वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. अण्णाभाउ यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर जनतेशी संवाद साधणार आहेत. यानंतर त्यांनी इस्लामपूरमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पाटील यांच्या घरी भोजनाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

याबाबत श्री. पाटील यांनी सांगितले, जो पक्ष शेतकरी हिताचे निर्णय घेतो त्या पक्षाबरोबर राजकीय पूरक भूमिका घेतली पाहिजे अशी आमचे नेते शरद जोशी यांची शिकवण आहे. तेलंगणाचे मुंख्यमंत्री केसीआर यांनी शेतकर्‍यांना  उर्जितावस्था आणण्यासाठी थेट दहा हजाराचे अनुदान जाहीर केले. तसेच शेतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणीही केली.

शेती व्यवसाय उध्दवस्त करणारे वन कायद्याबाबतही गांभीर्याने विचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे. तेलंगणामध्ये अल्पावधीत सिंचन योजनांची अंमलबजावणी करून सिंचन सुविधा उपलब्ध केल्या. महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक  जर पुसायचा असेल तर शेतीसाठी चांगले धोरण अंमलात आणणार्‍या राजकीय पक्षाला पूरक भूमिका घेतली पाहिजे. आपण सोमवारी राव यांच्या दौर्‍यात राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.