Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1980 मध्ये अस काय घडले होते ? ज्याचा शरद पवार वारंवार उल्लेख करतात.....

1980 मध्ये अस काय घडले होते ? ज्याचा शरद पवार वारंवार उल्लेख करतात.....


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रविवार, २ जुलै राेजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीला विरोध दर्शवला आहे. शरद पवार यांना पक्षाचा आश्वासक चेहरा कोणता? असे विचारले असता. पवार यांनी ‘शरद पवार’च असे उत्तर दिले. मी न्यायालयात नाही तर जनतेत जाणार, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. १९८० साली जे घडले त्याची पुनरावृत्ती करुन दाखवण्याचा एककलमी कार्यक्रम मी हाती घेत असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. १९८० मध्ये नेमक काय घडलं होत? ज्याचा शरद पवार वारंवार उल्लेख करतात? याविषयी जाणून घेऊयात….

१९८० मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक पार पडली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शरद पवारांचे बंड करुन स्थापन केलेलं पुलोद सरकार बरखास्त केले. महाराष्ट्रात बहुमताने सत्ता मिळवण्याची इंदिरा गांधी यांची महत्वाकांक्षा होती. लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांनी मोठे यश मिळवले. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने बाजी मारली. ८७ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने सत्ता मिळवली. त्याचबरोबर अनेक राज्यांत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. महाराष्ट्रात शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसच्या (समांतर काँग्रेस) ५४ जागा निवडून आणल्या होत्या. शरद पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. मात्र, इंदिरा काँग्रेस सत्तेत असल्याने आणि यशवंतराव चव्हाण यांची इंदिरा काँग्रेससोबत जाण्याची इच्छा असल्याने पवारांच्या पक्षात हालचाली सुरु झाल्या होत्या. पवार विदेशात गेल्यानंतर पक्षातील अनेक सहकाऱ्यांनी पक्षांतर केले.

शरद पवार ‘लोक माझा सांगाती’ या आत्मचरित्रात लिहितात, “मी दौऱ्यानिमित्त लंडनला गेलो आणि पक्षात पडझड सुरु झाली. आमच्या ५४ पैकी सहा-सात सोडून सर्व आमदार ‘काँग्रेस’मध्ये प्रवेश करते झाले. कमलकिशोर कदम, पद्मसिंह पाटील, मालोजीराव मोगल आणि आणखी दोघे आमदार तेवढे माझ्याबरोबर राहिले.” अशा परिस्थितीत शरद पवारांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा संघटना बांधण्यास सुरुवात केली. जनतेचे प्रश्न घेऊन संघर्ष केला. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी तरुण आणि नवख्या उमेदवारांना संधी दिली. पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे ५० पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले. १९८० नंतर पक्षातील अनेक सहकारी सोडून गेलेले असताना शरद पवारांनी १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत ‘फिनिक्स’ भरारी घेतली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.