फादर्स डे निमित्त सुषमा अंधारेची भावनिक पोष्ट, जगण्याची सगळी चित्तरकथा.......
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन, मुलांसाठी झटणारं अंतःकरण. आज जागतिक फादर्स डे आहे. याचनिमित्त शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जगण्याची सगळी चित्तरकथा..! म्हणत अंधारे यांनी बाबा म्हणजेच आईचे वडिल यांच्याविषयी लिहिलं आहे. 2023 सुषमा अंधारे या आपले आजोबा दगडू अंधारे यांचं नाव लावतात. सुषमा अंधारे यांच्यावर आजोबांचा खूप मोठा पगडा आहे. त्यांच्या जडणघडणीत आणि आयुष्यात आजोबांचे संस्कार खूप महत्वाची भूमिका बजावतात.
'ऐसी बात बोलो की कोई ना बोले झुठ, ऐसी जगह बैठो जहाँ कोई ना बोले उठ... "असे संस्कार आजोबांनी सुषमा अंधारे यांनी शिकवला.
बाबा चळबळले , " पालक म्हणजे ? "
मुख्याध्यापक काहिसे घूश्शातच , "अहो म्हणजे मुलीचे पालन पोषण .. सांभाळ कोण करतंय.. आजोबा म्हणाले मीच की ..
मुख्याध्यापक - काय नाव तुमचं ?
बाबा- दगडूराव .. लिहा..सुषमा दगडूराव अंधारे !!!
माझ्या शिक्षणाला घरात विरोध होता. बाबा ठामपणे पाठीशी उभे राहिले.
रहायला डोक्यावर निटसं छप्पर नव्हतं.. जागा गावच्या पाटलाने सहानुभूतीपोटी गोठ्याला लागुन दिलेली. पाटलांच्या चिरेबंदी वाड्याच्या एका भिंतीचा आधार घेत कोटा उभा केलेला... आईने कुणा कुणाच्या शेतात काम करून तुराट्याचे भारे आणले अन तीन भिंतींचा कुड उभा राहिला... आत तीन दगडाची चुल..
बाबा , आठवडी बाजारात बैलांची शिंगं तासण्याची कामं करायचे. गाई म्हशी बैल यांच्या खुर नख्या काढणं. शिंगांना शेंब्या बसवणं हे एक कलाकुसरीचं काम. शिंगं सुबक आकार देऊन ऐटदार अन् देखणी बनवणं हे काम तसं जोखमीचं.. कारण दिड दोन क्विंटल चा बैल उधळला तर पायखाली तुडवले जाण्याची किंवा शिंगं पोटाबिटात घुसण्याची भिती. पण बाबा तन्मयतेने हे काम करायचे. तालुक्यातील प्रत्येक गावच्या पाटलाची बैलजोडी ऐटबाज दिसायची कारण बाबांचा कलाकुसरीचा हात त्यांच्या शिंगावरून फिरलेला असायचा... बाजारदिवस नसेल तेव्हा शेतात मोलमजुरी ची कामं.. अधूनमधून लग्नमुंजीत सहभाग. लग्नमुंजीतलं बाबांना येणारं निमंत्रण हे मानाचं असायचं. कारण बाबा जातपंचायतीतील एक महत्वाचे पंच.
पंचायतीतले त्यांचे युक्तिवाद कबिरांच्या दोह्यांनी काठोकाठ भरलेले असायचे. माझ्यावर संत कबीरांचा प्रभाव असण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. रूढार्थाने देवीदेवतांना बाबांनी कधी नमस्कार केल्याचं आठवत नाही. घरात मामी ने कधी अशा पुजा मांडल्या तरी बाबा ओरडायचे. ओरडतानाही , " जत्रामें बिठाए फत्रा , तीरथ बनाए पानी....." हा कबिरांचा दोहा सांगत ओरडायचे.
जातपंचायती किंवा लग्न कार्यात ते ठरवून मागे लांब बसायचे अन मग कूणा जेष्ठ वयोवृद्धाने हे चित्र बघीतलं की ते बाबांना सन्मानाने उठवून पूढे नेत. मी बाबांनी विचारायची , बाबा लोक तुम्हाला मान देतात मग आधी च का बरं पुढं जाऊन बसत नाहीत. उगाच खोळंबा होतो सगळ्यांचा. यावर बाबांचा ठरलेला दोहा असायचा , ऐसी बात बोलो की कोई न बोले झुठ ऐसी जगह बैठो की कोई न बोले उठ...!!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.