पेन्शनमधून ६० वर्षांनंतर काढा एकरकमी पैसे, सदस्यांना पर्याय देण्याचा विचार होणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) काही बदल करण्याची सरकारची तयारी सुरू आहे. तसे झाल्यास वयाच्या ६० वर्षांनंतर एनपीएसमधून एकरकमी पैसे काढण्याची सुविधा योजनेच्या सदस्यांना देण्यात येणार आहे. पेन्शन निधी नियामक तथा विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) यावर काम करीत आहे.
'पीएफआरडीए'चे चेअरमन दीपक मोहंती यांनी सांगितले की, प्रस्तावित 'व्यवस्थित निकासी योजना' अंतिम टप्प्यात असून, पुढच्या तिमाहीत म्हणजेच सप्टेंबरअखेरपर्यंत ती कार्यान्वित केली जाऊ शकते. या योजनेद्वारे वयाच्या ७५ वर्षांपर्यंत पैसे काढण्यासाठी मासिक, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक निकासी पर्याय सदस्यांना निवडता येईल.
बदल का?
मोहंती यांनी सांगितले की, सध्या या योजनेत निवृत्तीच्या नंतर ६०व्या वर्षी ६० टक्के रक्कम काढता येते. उरलेली ४० टक्के रक्कम पेन्शन खरेदीसाठी वापरली जाते. अन्यत्र चांगला परतावा मिळत असेल, तर मी पेन्शन खरेदीचा पर्याय का स्वीकारू, असा विचार करून अनेकजण या योजनेत राहू इच्छित नाहीत. त्यामुळे योजनेत बदल करण्याचा विचार आम्ही करीत आहोत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.