प्रा मोहन पाटील सरांचा अमृतमहोत्सवी सत्कार शिरोळ इथं.. त्यांना अनंत शुभेच्छा...
अकरावीत असताना मी कविते सदृश्य काही ओळी लिहिल्या.. कविता कशाशी खातात ते ठाऊक नव्हतं.. नगर वाचनालयात काव्यवाचन स्पर्धा कुठल्यातरी संस्थेने घेतलेली.. उतावळेपणी मी नाव दिलं.. कविता खूप प्रामाणिकपणे लिहिली होती.. एका किळसवाण्या विचित्र मनोवस्थेत पराकोटीच्या अस्वस्थतेत लिहिलेली...
व्यासपीठावरून वाचली..
पुढच्या तथाकथित सुशिक्षित श्रोत्यांच्या ती पचनी पडली नाही.. साऱ्यांनी हुर्यो केलं..
टवाळी केली.. एकमेकांकडं बघून कुश्चीत हसले..
भर चौकात नागवं झाल्यागत वाटलेलं.. लोकांना ती अश्लील घाणेरडी वाटली की काय कुणास ठाऊक.. कुणी व्यवस्थित ऐकूनच घेतली नव्हती..
खाली मान घालून प्रेक्षागृहाच्या मधल्या मोकळ्या जागेतून मी मागं जाऊ लागलो..
साधारण मध्याच्या पुढे आलो असेन, तशी एक व्यक्ती चटकन माझ्यासमोर उभी राहिली..
दोन्ही हात पसरून मला भिडंत अलवार पाठीवर त्यानं शाबासकीची थाप दिली..
म्हणाले.." व्वा ss देखणी कविता..".
आख्ख्या सभागृहात सगळ्यांच्या विरोधात जाऊन एकट्याने दाद दिलेली.. सगळ्यांना कोलून...
सरळ बाहेर निघून जायचा माझा विचार मी उभ्याउभ्या बदलला..
सर्वात मागच्या बाकड्यावर जाऊन बसलो.. शेजारी नुकतीच ओळख झालेला एक कवी बसलेला... बाळ बाबर..
म्हणाला.." तुला कुणी शाब्बासकी दिली ते कळलं का ? "
म्हणालो.." नाही.."
तसा म्हणाला.." ते प्राध्यापक मोहन पाटील.."
माझी ती पहिलीच कविता.. त्या दिवशी मरता मरता वाचली...
पुढं ते नाईट कॉलेजला आले म्हणून तिथं मी एफ. वाय. ला ऍडमिशन घेतली..
रोज भेटू लागलो..
ते मराठीचे प्राध्यापक आणि मी विद्यार्थी..
दोघांना जोडणारा दुवा होता.. गायछाप..
युथ फेस्टिवल ला एकांकिकेची एन्ट्री द्यायचा शेवटचा दिवस होता..
काही ठरत नव्हतं.. हातात कोणतंही स्क्रिप्ट नव्हतं..
काय करावं या विचारात होतो.. मी आणि किरण कुलकर्णी डोकं धरून बसलेलो...
चहाच्या गाडीवर पाटील सर भेटले..
म्हणाले.. "कुठे हुडकताय स्क्रिप्ट ! लिही तूच.. लेखकाला मानधन द्यायला बजेट तरी कुठय ? नॉन ग्रँटेबल कॉलेज आपलं.."
म्हटलं.." जमेल ??"
म्हणाले.." प्रयत्न तरी करून बघ,."
इतर बऱ्याच गप्पा झाल्या. बोलता बोलता त्यांच्या तोंडून एक शब्द ऐकला.. अंधारवाटा..
त्या क्षणी तो वेगळा वाटला..
सरांना तसे म्हणालोही..
तर सर हसत हसत म्हणाले"लिही एकांकिका, अंधारवाटा.."
घरी आलो.. त्या शब्दानं चांगलंच पोखरलं होतं..
त्या रात्री रात्रभर जागून एकांकिका लिहिली..
युथ फेस्टिवलला केली..
" अंधारवाटा.."
माझ्या आयुष्यात मी लिहिलेली पहिली एकांकिका..
सरांची फायनल बिल ही कथा त्यावेळी जोरात होती.. त्यांच्या इतरही कथा वाचलेल्या.. त्यांनी स्टेशनडाक नावाचं साप्ताहिक (?) सुरू केलेलं.. सरच संपादक...
काही लिहून दे म्हणाले..
माझ्याकडे मुंबई नावाची माझी कविता होती ती दिली.. आणि ' सोबत 'नावाची मी लिहायचा प्रयत्न केलेली पहिलीच कथा.. तीही हळूच त्यांच्याकडं दिली..
म्हणालो.."कथा लिहिलीय.. सहज.."
सरांनी स्टेशनडाक ला मुंबई कविता छापली..
कथेचा शेवट त्यांना अपुरा वाटलेला..
त्यांनी पुढं चार ओळी लिहून कथेचा शेवट बदलला.. शेवट एकदम देखणा आणि गोड झाला..
कथा एकदम गर्कन फिरवलीच..
अगदी छोटासा हात फिरवला पण कथेचं रूप कमालीचं पालटलं..
ती कथा त्यानी बिजनेस एक्सप्रेसच्या दिवाळी अंकात दिली.. स्पर्धेला...
पहिली आली..
माझी ती पहिली कथा.. 'सोबत..'
मोहन पाटील सरांनी उचलली..
ती उचललीच...
एस. वायला होतो..
मौज नं सरांचं पुस्तक काढलेलं..
दोन लघु कादंबऱ्या.. लिगाड आणि खांदेपालट..
मी मला जमेल तसं पुस्तकाची ओळख करून देण्याचा पहिला प्रयत्न केलेला..
लिहिलं.. सरांना दाखवलं..
म्हणाले.." हेही जमतय की.."
मी ते केसरी पेपरला पाठवलं..
तिथं ते छापून आलं...
1986.. 87 साल असावं..
जयसिंगपूर कोल्हापूरच्या रस्त्यावर मोकळ्या रानात गच्च अंधारात उघड्या आभाळाखाली फक्त साहित्यावर प्रचंड गप्पा मारल्या.. सरांचं खूप ऐकलं ... त्यांनी कायबाय वाचून दाखवलं.. घडाडा बोलायचे..रात्रभर.. पहाटेचा गोंडा फुटेपर्यंत.. कितीदा तरी.. मानगुटीवर भूत बसल्यागत त-हा...
सोबतीला धन्या कुलकर्णी...
सरांनी,पंचाहत्तर वर्षात पदार्पण केलंय..
अडतीस ते चाळीस वर्ष त्यांना पाहतोय..तसेच..
साधे,सरळ,निगर्वी..दिलखुलास,..
विद्वत्तेची आणि व्यासंगाची भीती दाखवून त्यांनी कोवळी रोपं उपटली नाहीत.. उलट अप्रूबाई केली..
भवतीचं तणकाट टीचकलं.. आळी केली..
तसं मी काहीच लिहिलं नाही..
मध्ये मध्ये लिहिण्याचा छोटा छोटा प्रयत्न असतो..
तेव्हा सर ते वाचतायंत.. एवढच सजग भान असतं..
त्यामुळं लिहिण्यापेक्षा खोडणं जास्त होतं..किंवा काहीच होत नाही...
होइनाका...
वाफसाच नाही तर कुणच्या देवानं ऊतू जावून बी टोकायला सांगितलय !!
सरांना शुभेच्छा...
.... संजय जगन्नाथ पाटील..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.