संगमनेरात बनावट डॉक्टरवर गुन्हा दाखल, ना वैद्यकीय शिक्षण, ना परवानगी
वैद्यकीय व्यवसायासाठीचे शिक्षण व परवानगी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱया बनावट डॉक्टरवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद आयुब शेख (रा.नवरंग कॉम्प्लेक्स, बागवानपुरा, संगमनेर) असे बनावट डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे संगमनेर शहरात या डॉक्टरचा दवाखाना राजरोसपणे सुरू होता. संगमनेर शहरात यापूर्वी अनेक 'मुन्नाभाई' आढळून आले आहेत. त्यात गुरुवारी आणखी एका डॉक्टरची भर पडली.
संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सचिव प्रतिभा कचकुरे यांना संबंधित डॉक्टरवर कारवाईचे आदेश दिले होते.
जावेद शेख याच्या रुग्णालयाची व कागदपत्रांची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान त्यांना शेख याच्याकडे वैद्यकीय पदवी आढळली नाही. बोगस डॉक्टर शोध समितीच्या सचिवांनी जावेद शेख याच्याकडे औषध उपचाराविषयी चौकशी केली असता त्याने नैसर्गिक उपचारात जडीबुटीचा वापर करत असल्याचे सांगितले. क्लिनिकसाठी वैद्यकीय व्यवसायातील आवश्यक नोंदणी पत्रही त्याच्याकडे आढळले नाही. जी कागदपत्रे डॉक्टरने सादर केली त्यामध्ये संबंधित कोर्स हे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून केल्याचे आढळले नाही.
तपासणीदरम्यान शेख यांनी त्यांच्या क्लिनिकवर आयुर्वेदिक व निसर्गोपचार केंद्र असा फलक लावल्याचे आढळून आले. तसेच क्लिनिकमध्ये त्यांनी तयार केलेले हमसफर हर्बल मुतखडा आयुर्वेदिक औषध आढळून आले. याशिवाय कोणतेही नाव नसलेले गोळ्यांचे डबे आणि चुरणाचे डबे आढळले. त्यामुळे त्याच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले पुढील तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.