यावर्षीही सांगली - साताऱ्याला महापूरचा बसणार मोठा फटका; कोट्यवधींच होणार नुकसान?
कृष्णेसह कोयना काठावरील गावात महापूर ठरलेलाच असतो. त्याच्या अभ्यासासह पूररेषा पुनर्रचनेचा निर्णय दोन वर्षांपासून अधांतरीच राहिला आहे. त्यामुळे यंदाही त्याचा सातारा, सांगली जिल्ह्यांना फटका बसण्याची भीती आहे. अभ्यास गटाच्या स्थापनेनंतर राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे विद्यमान सरकारनेही त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे काठावरील गावांना यंदाही महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीशी सामना करावा लागणार आहे. महापुराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र गटाची स्थापना झाली. त्याचदरम्यान राज्यात सत्तांतर झाले.
त्यामुळे अभ्यासगट स्थापन करण्यापलीकडे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे यंदाही पूररेषेबाबत धोरणात्मक निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुरामुळे कोट्यवधींचा हानी सोसावी लागण्याची भीती आहे. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी निधी फिरवताना अंतर्गत अनियमिततेमुळे पूररेषा ठरविण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव आहे. त्याचा मोठा फटका पूरग्रस्त भागाला बसत आहे. पूररेषेला विरोध झाल्याने तो निर्णय अनिर्णित दिसत आहे. तत्कालीन सरकारने नव्याने पूररेषा होण्याचे संकेत दिले होते. त्याअनुषंगाने पुनर्रचनाही केली जाणार होती. मात्र, तो निर्णय अर्धवट स्थितीत राहिल्याने कठीण स्थिती आहे. सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी सुमारे पावणेचार लाख लोकांना पुराचा फटका बसला. त्यात कोट्यवधींची हानीही झाली.
२५ वर्षांनंतर ती स्थिती आली होती. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली. पहिल्या टप्प्यात कृष्णा नदीची पूररेषा बदलण्याची हालचाली झाल्या. मात्र, तो निर्णय अधांतरीच आहे. त्याच्या अभ्यासासाठी स्वतंत्र गट स्थापनही झाला. मात्र, त्या गटाचेही काम अपेक्षित गतीने झाले नाही. जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण तर सांगली जिल्ह्यात बहुतांशी गावांवर घोंगावणारा धोका लक्षात घेऊन त्याची कारणे शोधण्याची घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. जिल्ह्यात २००५ मध्ये पूररेषा बदलून निश्चित झाली. त्यापूर्वी १९७६ मध्ये पूररेषा झाली होती. मात्र २००५, २००६ मध्ये झालेल्या पुराच्या हाहाकाराने शासनाला जाग आली. महापूर ओसरल्यानंतर काहीही झाले नाही. त्यानंतर पुन्हा आलेल्या महापुराने शासनाची झोप उडाली. त्यामुळे पूररेषा बदलण्याची केवळ चर्चा रंगली, तीही अंतिम टप्प्यापर्यंत गेलेली नाही.
पावसासोबत अस्वस्थताही...
महापुराच्या कारणांचा अभ्यास करताना सगळ्याच परिणामांचा विचार होणार होता. जिल्ह्यातील कोयना, मोरणा गुरेघर, तारळी, उत्तरमांड, महिंद, चिटेघर, धोम, कण्हेर आणि उरमोडी आदी धरणांच्या पाण्याची आवक कृष्णा नदीत होते. त्यानंतर वारणा, पंचगंगाही कृष्णा नदीत मिसळते, त्याचाही अभ्यास होणार होता. धरणांच्या क्षमता तपासल्या जाणार होत्या. मात्र, यातील काही झाले नसल्याने त्या नद्यांच्या काठावर पुन्हा पावसासह पुराची अस्वस्थता आहे.
कृष्णा नदीचाही अभ्यास हवेत
कृष्णा नदीत कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळी, कुडाळी, केरा, मोरणा, वांग, वारणा, कडवी, शाली, अंबरडे, कुंभी, कासारी, गरवाली, जांभळी, सरस्वती, धामणी, तुळशी, भगवती, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्हपाणी, मार्कंडीय, मलप्रभा आदी नद्या मिसळतात. त्या सगळ्यांचा पाण्याचा प्रवाह कृष्णा नदीत मिसळतो. त्यामुळे कृष्णा नदीची व्याप्ती वाढते. त्याचाही अभ्यास होणार होता. त्याला अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीचीही गरज आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.