कोल्हापूर पणजी खासगी बसला अपघात
कोल्हापुरहून पणजीकडे येत असलेल्या खासगी स्लीपर बसला (एमएच 09 एफएल 1528 ) बुधवारी पहाटे अपघात झाला. उत्तर गोव्यातील मोपाजवळ मुख्य रस्त्यावर पहाटे पाचच्या सुमाटास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. तथापि, अचानक झालेल्या या प्रकारामुळे भीतीने बसमधील सर्वच प्रवाशांची गाळण उडाली होती. अपघातावेळी बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत होते.
बस ड्रायव्हरला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस अचानक सिमेंटच्या मुख्य रस्त्यावरून खाली उतरली. त्यामुळे अर्धी बस सिमेंटच्या रस्त्यावर आणि अर्धी बस खाली अशी बसची अवस्था होती. त्याच अवस्थेत बस बंद पडली. अचानक मोठा आवाज होऊन बस बंद पडल्याने बसमधील प्रवासी हादरले. अनेक प्रवासी झोपेत होते. त्यामुळे कुणालाही नेमके काय घडले याची कल्पना नव्हती. आवाजाने मात्र सर्वांचीच तारांबळ उडाली. क्लिनर ड्रायव्हरने सर्वांना शांतपणे खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर सर्वजण बस बाहेर पडले.बस तशीच अर्धवट कलंडलेल्या अवस्थेत थांबून होती. पाऊस नसल्याने प्रवाशांचे फार हाल झाले नाहीत. पण त्यांना गोव्याकडे येण्यासाठी इतर वाहनांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर हायवेवरील इतर खासगी बसेस आणि महाराष्ट्र शासनाच्या बसेसमधून प्रवासी गोव्याकडे आले. जिथे अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे. चार पदरी रस्त्यापैकी एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. ते काम सुरु आहे..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.