पंचशीलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर केवळ दुचाकीस परवानगी आजपासून वाहतुकीत बदल : पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली
सांगली: माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगरजवळील रेल्वे उड्डाणपूल पाडण्यात आल्याने नागरिकांची अडचण झाली आहे. जुना बुधगाव रस्त्यावरील पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दुपारी परिसराची पाहणी केली आणि वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या.
त्यानुसार गुरुवारपासून रेल्वे फाटकाकडून पंचशीलनगरकडे जाणाऱ्या मार्गावर आता केवळ दुचाकीस परवानगी देण्यात आली आहे. अन्य सर्व वाहनांनी शिवशंभो चौकातून माधवनगरकडे जाण्याचे निर्देश पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत. रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सांगली - माधनवगर रस्त्यावरील चिंतामणीनगरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. पर्यायी मार्गाचे योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने दोन दिवसापासून जुना बुधगाव रस्ता, बायपास तसेच कर्नाळ रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला. प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी पूल बंद करताना पर्यायी मार्ग दिले असले तरी संबंधित मार्गाची रस्त्यावर उतरुन पाहणी न केल्याने वाहतूक समस्या निर्माण झाल्याचे नागरिकांचे मत आहे. वाहतूक पोलिसांनी तसेच रेल्वे पोलिसांनीही त्यांच्यापरीने वाहतुक सुरळीत होण्याचा प्रयत्न केला तरीही वाहतुकीचा खोळंबा होत होता. बुधवारी दुपारी पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी रस्त्यावर उतरुन सुमारे दोन तास परिस्थितीची पाहणी केली.
वाहतुक शाखेचे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरिक्षक मुकुंद कुलकर्णी, संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय क्षीरसागर आणि रेल्वेचे अभियंता शंभू चौधरी यांनी पोलीस अधिक्षकांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. यानंतर रेल्वे फाटकमार्गे पंचशीलनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीची जड वाहनांमुळे कोंडी होत असल्याचे निदर्शनास येताच या रस्त्यावर केवळ दुचाकी वाहनांनाच परवानगी देण्याचे निर्देश पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत. तसेच दुचाकी व्यतिरिक्त अन्य सर्व वाहनांनी होंडा शोरुममार्गे बायपास रस्त्यावरुन शिवशंभो चौकमार्गे माधवनगरकडे जाण्याचे निर्देशही यावेळी अधिक्षकांनी दिले. या निर्णयाची अंमलबजावणी आज गुरुवारपासून करण्यात येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.