मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्रीजी.... तुम्ही न येणं बरं नव्हं....-मधुकर भावे
लेखाच्या शिर्षकातील मुख्य मुख्य मुद्यालाच हात घालतो... महाराष्ट्राचे फार मोठे नेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’ या चरित्र गौरवग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत... हे चांगले झाले नाही. पुस्तक कोणी लिहिले आणि कोणावर लिहिले ही बाब गौण आहे. ज्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे महामहीम राज्यपाल करणार आहेत, आणि जो कार्यक्रम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे... तशा पत्रिकाही छापलेल्या आहेत.... पोस्टर्स लागलेली आहेत... राज्यपाल या कार्यक्रमाला आहेत त्या कार्यक्रमाला हजर राहण्याचे मान्य केल्यावर गैरहजर राहणे हे सर्वस्वी राज्यशिष्टाचाराच्या विरुद्ध आहेच... शिवाय घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने तर हे भान पाळलेच पाहिजे. पुस्तक प्रकाशन कार्यक्रम शासकीय नव्हता हे मान्य, तरीही राज्यपाल शासकीयच आहेत. घटनात्मक आहेत. ते जिथे येतात आणि आपण जो कार्यक्रम स्वीकारतो, त्याला अनुपस्थित राहणे हा राजशिष्टाचाराचा भंगच आहे.
शिवाय लोकांना ती गोष्ट अतिशय खटकणारी आहे. बाळासाहेब देसाई हे व्यक्तीमत्त्व महाराष्ट्रासाठी तरी मोठे व्यक्तीमत्त्व आहे. गेल्या ५० वर्षांत या महाराष्ट्रात जी कर्तबगार, आणि प्रभावी नेतेमंडळी मानली गेली त्यात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई हे चार तर ५० वर्षांपूर्वीचे विकासाचे मुख्य चार खांब... प्रमुख नेते. शिवाय राज्याचे आजचे मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यातले, बाळासाहेबही त्याच जिल्ह्यातील. बाळासाहेब यांच्यामुळे जे कोयना धरण उभे राहिले त्या काेयना धरणाच्या आल्याड बाळासाहेबांचे, गाव आणि पल्याड एकनाथ शिंदे यांचे गाव. हा आणखीन एक भाग वेगळा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तरी यायला हवे होते. त्यांच्या खासदार सुपूत्राच्या कल्याण- डोंबिवली येथील कार्यक्रमांत ते गुंतले, असे सांगण्यात आले.पण तो कार्यक्रम दोन दिवसांनंतर घेता आला असता. शिवाय मुख्यमंत्र्यांसाठी सायंकाळी ६.३० च्या ऐवजी रात्री ८.३० वाजताच्या वेळेला राज्यपालांनी मान्यता दिली. त्यामुळे तर मुख्यमंत्र्यांनी यायलाच हवे होते. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमाचे तसे नियोजन त्यांनीच करायला हवे होते. ते आले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीला निघून गेले.... त्यांचा तिथे कार्यक्रम होता, असे सांगण्यात आले. फडणवीस आले नाहीत, ठीक आहे... उपमुख्यमंत्री पद हे काही घटनात्मक पद नाही. ही राजकीय सोय आहे. शिवाय कदाचित फडणवीस यांना असेही वाटत असेल की, बाळासाहेब त्यावेळच्या काँग्रेसचे मंत्री. महाराष्ट्राची बांधणी करण्यात या मोठ्या नेत्यांचा वाटा आहे.. त्यात बाळासाहेबही अग्रक्रमाने आहेत. पण, फडणवीस यांचे म्हणणेच असे आहे की, ‘७५ वर्षांत काँग्रेसने काहीच केलेले नाही’. फडणवीस जन्म जरी १९७० चा असला तरी त्यापूर्वीसुद्धा काहीच घडलेले नाही. असे मानणारे ते आहेत. महाराष्ट्रात जे काही घडले ते सगळे २०१४ च्या नंतर घडले. त्यामुळे त्यांच्या लेखी बाळासाहेबांचे महत्व नसेलही... पण महाराष्ट्राला तसे वाटत नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे नातू शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेवून आपल्या आजोबांचे पांग फेडले, असा तो कार्यक्रम झाला.बाळासाहेबांचे नाव ‘दौलत’.... पुस्तकाचे नाव ‘दौलत’.... दौलत या शब्दाचा इंग्रजी अर्थ ‘वेल्थ’ असा आहे. पण दौलत शब्दाला जे परिमाण आहे, तो दर्जा वेल्थ शब्दाला नाही. ५० वर्षांपूर्वीच्या नेतेमंडळीत महाराष्ट्राची बांधणी करणाऱ्या नेत्यांमध्ये दौलतराव श्रीपतराव देसाई ऊर्फ बाळासाहेब... हे उठून दिसणारेच व्यक्तिमत्त्व होते. यशवंराव चव्हाण असतील... वसंतदादा असतील... बाळासाहेब देसाई असतील... सातारा जिल्ह्यातील या तिन्ही नेत्यांनी लहाणपणापासून दारिद्र्य... कष्ट... या सगळ्याचा सामना करून आपले मोठेपण सिद्ध केले आहे. बाळासाहेब हे १२ वर्षांचे असताना कोल्हापूरच्या एका दवाखान्याची साफसफाई करून महिना १० रुपये मिळवत होते आणि आपले शिक्षण करीत होते. अगदी लोकल बोर्डाच्या अध्यक्षापासून (१९४१) ते १९८३ पर्यंत मंत्री म्हणून बांधकाम, शिक्षण, कृषी, गृह, महसूल आणि विधानसभा अध्यक्ष या प्रत्येक पदावरून बाळासाहेबांचा ठसा उमटला नाही, असे झाले नाही. शिवाय एक दरारा असलेले व्यक्तीमत्त्व ही त्यांची महाराष्ट्रातील ओळख. नंतर कुणालाही मिळाली नाही. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे अभिमानाचे दोन पुतळे लोकवर्गणीतून उभे केलेले हा लोकनेता. असे हे बाळासाहेब. खरं म्हणजे त्यांची जन्मशताब्दी २०१० साली राज्य सरकारने शासकीय इतमामात करायला हवी होती. अशोक चव्हाण तेंव्हा मुख्यमंत्री होते. १० मार्च २०१० ला ही जन्मशताब्दी होती. आणि १ मे २०१० ला महाराष्ट्र राज्याला ५० वर्ष पूर्ण झाली होती. तोही कार्यक्रम दणकेबाज व्हायला हवा होता... पण शताब्दीही अधिकृतपणे साजरी झाली नाही... आणि सुवर्ण महोत्सवी राज्यगौरव कार्यक्रमही कसा झाला, हे आज कोणाला आठवतही नाही. जे झाले ते झाले... बाळासाहेबांच्या वाट्याला राजकीय उपेक्षा अनेकवेळा आली होती. त्यातून त्यांना नैराश्यही आले होते. पण तरीही त्यांचे मोठेपण महाराष्ट्राला अमान्य करता येत नाही, येणार नाही.
या गौरवग्रंथ कार्यक्रमाला महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल श्री. रमेशजी बैस हे ८.३० वाजताच्या रात्रीच्या कार्यक्रमाला आले. पूर्ण तासभराचा कार्यक्रम त्यांनी स्वीकारला. त्यांची मराठी भाषेची थोडी अडचण आहे तरीही बाळासाहेबांची पूर्ण माहिती मिळवून त्यांच्या भाषणात त्यांनी उद्याच्या पिढीला ‘बाळासाहेब कसे आदर्श आहेत’, याचे नेमक्या शब्दांत आणि प्रभावी हिंदीत वर्णन केले. महाराष्ट्राचा गौरव करताना त्यांनी शब्दांत कुठेही कमतरता ठेवली नाही. मागचे राज्यपाल आणि हे राज्यपाल यातील फरक १० मिनीटांच्या भाषणात समजून आला. श्री. बाळासाहेब देसाई सलग सहावेळा पाटण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आणि १९६७ ला बिनविरोध निवडून गेले.
असे सलग सातवेळा ते आमदार होते. ज्यांच्या हस्ते गौरवग्रंथाचे प्रकाशन झाले ते माननीय राज्यपाल महोदय रमेशसाहेब १९९६ पासून १६ व्या लोकसभेपर्यंत सलग सात वेळा रायपूर मतदारसंघातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. बाळासाहेब मंत्री होते... रमेश बैस साहेबही अटलबिहारी वाजपेयी साहेबांच्या मंत्रीमंडळात केंद्रात मंत्री होते. सूचना प्रसारण, पर्यावरण, वने अशी मोठी खाती त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. लोकसभेच्या लोकलेखा समितीचेही ते अध्यक्ष होते. झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपालही होते.... असे हे भारदस्त व्यक्तीमत्त्व सातवेळा खासदार, त्यांच्या हातून सात वेळा आमदार असलेल्या बाळासाहेबांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणे हा ही एक योगायोग... आणखी एक निरिक्षण महत्त्वाचे आहे. राज्यपालांचे मी अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर लगेच राष्ट्रगीत होते आणि राज्यपाल उजव्या बाजूला वळून व्यासपीठ पायउतार होतात.... तिथपर्यंत श्रोत्यांमध्ये कोणीही जागा सोडायची नसते. त्या पदाचा सन्मान करण्यासाठी हे नियम फार प्रभावी वाटतात. पण या राज्यपालांनी राष्ट्रगीत झाल्याबरोबर व्यासपीठावरील सर्वांशी हस्तांदोलन केले.... गौरवग्रंथ उत्तम झाला, ही भावना व्यक्त केली. एवढेच नव्हे तर ‘फुरसतसे मिलने को आ जाईए’ असे आमंत्रणही सर्वांना दिले. महाराष्ट्राला एक भारदस्त राज्यपाल मिळाल्याची जाणीव फार थोड्या वेळाच्या कार्यक्रमात झाली. उच्च विद्याविभूषित राज्यपाल सयंमी, शांत आणि बुद्धीमान आहेत. त्याचीही झलक दिसून आली.या समारंभाच्या निमित्ताने शंभूराज देसाई यांच्या कळकळीबद्दलही लिहिले पाहिजे. ते आता मंत्री आहेत... पण ते कोणत्या पदावरही नव्हते तेव्हाही म्हणजे १९८३ नंतर बाळासाहेबांच्या प्रत्येक स्मृतिदिनाला त्यांनी मरळी येथे दिवसभर कार्यक्रम केले नाहीत, असे एकही वर्ष नाही. पदावर असो नसो... आपल्या आजोबांच्या कर्त़ृत्त्वाची ही कृतज्ञाता भावना अलिकडच्या काळात किती नातवंड जपत असतील! शिवाय मंत्रीपदाची संधी मिळाल्यावर आपल्या आजोबांचे ज्या पद्धतीने मरळी येथे स्मारक उभे केले त्यातील ग्रंथालय... विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, संगणकीय शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी सर्व तरतूद... छान सभागृह... आणि आपल्या आजोबांची शासकीय पातळीवर जन्मशताब्दी झाली नाही याची सल मनात ठेवून, १३ वर्षांनंतर ती सगळी कसर शंभूराज यांनी भरून काढली. असे पदोपदी जाणवत होते. या खानदानी घराण्याशी माझा ६० वर्षे संबंध आहे. आणि त्यामुळे त्या संपूर्ण कार्यक्रमात ६० वर्षांपूर्वीचे बाळासाहेब त्यांचा तो दरारा... त्यांचे चालणे.. बोलणे...
मनातून असलेला प्रेमळपणा... सगळे काही आठवत होते... या गौरवग्रंथामुळे एक चांगले काम करता आले, याचा आनंद आहे. मात्र, राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम स्वीकारूनसुद्धा न येणे हे काही चांगले झाले नाही. तरी बरं... विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर आले आणि बाळासाहेब जसे िनर्णय घेत होते, तसा निर्णय घेईन, असे सूचकपणे बोलले. त्यांच्या या वाक्याला खूप टाळ्या पडल्या... हश्या उसळला. संदर्भही समजला... नार्वेकरजी, तुम्हालाही राजकीय परंपरा आहे. तुम्ही रामराजे निंबाळकर यांचे जावई. रामराजे यांचे आजोबा मालोजीराव नाईक-निंबाळकर हे कोयना धरणाच्या सुरुवातीचे बांधकाम मंत्री. बाळासाहेबांचे मित्र. तुम्ही समारंभाला ऐनवेळी येणे आणि त्याचा आनंद घेणे, हा ही योगायोग... फक्त सांगणे एकच. ‘बाळासाहेब तडाकून निर्णय करायचे...’ तुम्ही तसा निर्णय कराल.... पण, बाळासाहेब निर्णय करायला वेळ घेत नव्हते. एवढेही लक्षात असू द्या....’
सध्या एवढेच...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.