लाचखोर मुख्याधिकारी विनायक औंधकर निलंबित
विटा: अखेर विटा नगरपालिकेचे लाचखोर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत ७ जूनरोजी नगर विकास खात्याने आदेश काढला आहे. विटा शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाकडे पाच मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी औंधकर यांनी केली होती. याबाबत संबंधित बांधकाम व्यवसायिकांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि मुख्याधिकारी औंधकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अडीच लाखांऐवजी तडजोडी अंती २ लाख रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर १६ मेरोजी २ लाख स्वीकारताना मुख्याधिकारी विनायक औंधकर यास लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. विटा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लाचप्रकरणी विनायक औंधकर यांना १७ मेरोजी अटक केली होती. तेंव्हापासून २० मेपर्यंत म्हणजे सुमारे ४ दिवस ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी ते पोलीस कोठडीत रिमांडमध्ये होते. त्यामुळे नागरी विकास खात्याने ७ जूनरोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, विनायक औधकर हे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४. पोटकलम (२) च्या तरतूदीनुसार पोलीस कोठडीत स्थानबद्ध दि. १७ मेपासून निलंबित झाल्याचे मानण्यात आले आहे. आणि ते पुढील आदेश येईपर्यंत निलंबित राहतील.दरम्यान, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची कराड, आळंदी आणि कोल्हापूर येथील कारकीर्द पूर्वीपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे. यावेळी तर त्यांनी लाच थेट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये स्वीकारली. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात विटा पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून सुरू केलेला विनायक औंधकर यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.