लोकसभेआधी चर्चांना उधाण; सांगलीत भाजपमध्ये खांदेपालट होणार, की काँग्रेसमध्ये?
नेहमी उशिरा जाग येणाऱ्या काँग्रेसनं यावेळी लवकर आळोखेपिळोखे द्यायला सुरुवात केलीय. लोकसभेच्या निवडणुकांचा बिगूल कधीही वाजेल, या भीतीनं पक्षातील हालचाली (निदान दाखवण्यापुरत्या वाढवल्यात. येत्या रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या सत्कार येत्या रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या सत्कार समारंभात शक्तिप्रदर्शन करून थेट शड्डू ठोकण्याचे मनसुबे दिसताहेत. दुसरीकडं भाजपमध्ये लोकसभेचं तिकीट खासदार संजयकाका पाटलांनाच मिळणार, असं त्यांचे समर्थक म्हणत असले तरी, पक्षातील वातावरण गढूळ झाल्यानं गोपीचंद पडळकर आणि संग्रामसिंह देशमुख यांची नावं पुढं आणली गेलीत.
कुणी लोकसभेला तर कुणी विधानसभेला
कर्नाटक विधानसभेच्या निकालानं काँग्रेसला उभारी मिळाल्यानं सांगलीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलंय. माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांचा त्यात पुढाकार. शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभेचे इच्छुक विशाल पाटील, जयश्रीताई पाटील सोबतीला आहेत. या तिघांचे तीन वेगवेगळे गट आणि तिघंही इच्छुक. कुणी लोकसभेला तर कुणी विधानसभेला! त्यामुळं नेत्यांच्या नजरेत येण्यासाठी तिघांचीही तयारी असणारच. कारण सिद्धरामय्यांसोबत एच. के. पाटील आणि एम. बी. पाटील हे कर्नाटकचे वजनदार मंत्रीही येताहेत. एच. के. पाटील महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, तर एम. बी. पाटील जतशेजारच्या बबलेश्वरचे. तुबची-बबलेश्वर योजनेतून जतला पाणी आणण्यासाठी धडपडणाऱ्या जिल्हाध्यक्ष आ. सावंतांशी त्यांची चांगली जानपहेचान. भाजपला नामोहरम करणाऱ्या कर्नाटकच्या तिघा दिग्गजांच्या सत्कारावेळी कर्नाटक- महाराष्ट्राच्या पाण्यावर तर चर्चा होईलच, पण लोकसभेचा शडूही ठोकला जाईल.
संजयकाकांचा 'यूपी'मधला दोस्ताना कामाला आला!
मागच्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना भाजपनं जिल्ह्यात पाचारण केलेलं. त्यांच्या जिल्हा दौऱ्यात तासगाववरच जास्त भर दिलेला. त्यांनी लोकसभेला संजयकाका पाटील आणि विधानसभेला काकांचे पुत्र प्रभाकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं स्पष्ट केल्याचं काकांचे समर्थक सांगू लागले. आता उत्तरेतल्या आणखी काही राज्यांतले मंत्रीही येताहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं शिराळ्यातलं साधूपंथीय 'कनेक्शन' काकांनीच शोधलेलं. शिवाय काकांनी उत्तर प्रदेशात केलेली उद्योग उभारणी, यातून 'यूपी' वाल्यांशी त्यांचा दोस्ताना वाढलेला. दोस्तीचा फायदा असा होतोय.
सारं काही 'खुट्टा' बळकट करण्यासाठी चाललंय तर....
लोकसभा आणि विधानसभेला एकाच घरात तिकीट, हे भाजपमध्ये चालेल का, असा सवाल काहींनी पसरवायला सुरुवात केली, पण देशभरात भाजपमध्ये अशी उदाहरणं आहेत, हे त्यांना ठावं नसावं! पण त्याचवेळी कुजबुज सुरू झाली की, संजयकाकांचं लोकसभेचं तिकीट कापून विधानसभेला द्यायचा बेत शिजतोय, त्यामुळं काकांनीच शक्तिप्रदर्शन करून लोकसभेला आपली आणि विधानसभेला मुलाच्या नावाची चर्चा घडवून आणलीय. सारं काही 'खुट्टा' बळकट करण्यासाठी!
चर्चा गोपीचंद आणि संग्रामसिंहांची
भाजपमधून आता गोपीचंद पडळकर आणि संग्रामसिंह देशमुख यांची नावं पुढं आलीत. काकांचे कट्टर विरोधक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी लोकसभेसाठी हालचाली चालवल्या होत्या, पण साखर कारखान्याच्या व्यवहारातून त्यांच्यावर बदनामीचा शिक्का बसलाय. त्यांचे चुलतबंधू संग्रामसिंह यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद सांभाळलंय. स्वत:चा साखर कारखाना, दूध संघ आहे. संजयकाकांनी काँग्रेसच्या कदम गटाशी आणि राष्ट्रवादीतल्या जयंत पाटील गटाशी दोस्ती वाढवलीय, तर भाजपसोबत शिवसेनेच्या नेत्यांना अंगावर घेतलंय. परिणामी नवा आणि तरुण चेहरा म्हणून दोघांची शक्यता वर्तवली जातेय.
मेतकूट आणि भाजपचं नेटवर्क
संजयकाकांना विधानसभेला उतरवून गोपीचंद पडळकरांना लोकसभेच्या रिंगणात आणण्याची चाचपणीही भाजपनं केलीय. पडळकरांनी मागच्यावेळी लोकसभेला वंचित बहुजन आघाडीतून उतरून तीन लाखावर मतं घेतली होती. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आहेत आणि विरोधकांवर विशेषत: राष्ट्रवादीवर दणकून तोंडसुख घेतात. जहाल भाषा, जिल्हाभरातील ओळख, संजयकाका सोडून पक्षातल्या इतर नेत्यांशी मेतकूट आणि भाजपचं नेटवर्क त्यांच्या पथ्यावर पडेल, असं बोललं जातं.
जाता-जाता
काँग्रेसकडून विशाल पाटील, भाजपकडून गोपीचंद पडळकर यांच्या लढतीत 'वंचित'कडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना 'उतरवलं' तर..? 'मराठा विरुद्ध धनगर' अशी कुस्ती होईल. विशाल यांची मतं चंद्रहार खातील आणि पडळकरांचा मार्ग सुकर होईल... पुन्हा मागच्यावेळची 'गेम' साधता येईल, ही भाजपमधली चर्चा. ताजा कलम : पृथ्वीराज देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी 'आमचं ठरलंय' अशी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू केलीय. नेमकं कुणाचं काय ठरलंय आणि कुणी कुणाला गाठलंय, हे आता कळेलच!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.