Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलाच्या वागण्याला घरचे वैतागले; बापानेच सुपारी देऊन केला खून

मुलाच्या वागण्याला घरचे वैतागले; बापानेच सुपारी देऊन केला खून 



जन्मदात्या बापानेच सुपारी देत मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. पोलिसांनी काही तासांमध्येच या प्रकरणाचा उलगडा करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. तारदाळमध्ये (ता. हातकणंगले) ही घटना घडली. राहुल दिलीप कोळी (वय 31 रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. दिलीप कोळी आणि विकास पोवार (दोघे रा. तारदाळ), सतीश कांबळे (रा. तमदलगे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. वडिलांनी 75 हजार रुपयांना सुपारी देऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. शहापूर पोलिसांकडे याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

असा झाला खुनाचा उलगडा

गुरुवारी पहाटेच्या सुमारास राहुलचा मृतदेह तारदाळ माळावर आढळल्याची माहिती शहापूर पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे पटरीच्या लगत राहुलचा मृतदेह सापडला. पोलिसांनी रेल्वेला धडक बसून मृत्यू झाल्याचा संशय होता, पण मयत राहुलच्या डोक्यावर वर्मी घाव दिसून आले. तसेच मृतदेहापासून काही अंतरापर्यंत रक्ताचे थेंबही आणि सडाही दिसून आल्याने घातपाताची शंका आली.

75 हजार रुपयांची सुपारी देत केला खून

पोलिसांनी राहुलच्या नातेवाईकांकडे तसेच वडील आणि भावाकडेही चौकशी केली. यावेळी वडिलांवर पोलिसांचा संशय बळावला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली असता कौटुंबिक वादातून वडिलांनी दोन साथीदारांसह राहुलचा खून केल्याची कबुली दिली. यासाठी रोख 75 हजार रुपये विकास पोवार आणि सतीश कांबळेला दिले. सुरुवातीला 25 हजार रुपये दिले आणि उर्वरित रक्कम खून झाल्यानंतर देण्याचे ठरले होते.

मुलाच्या वागण्याला घरचे वैतागले

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मयत राहुल हा दिलीप कोळीचा मुलगा आहे. त्याचा विवाह झाला होता तसेच व्यसनाच्या आहारी गेला होता. मद्यपान करुन कुटुंबाला त्रास देत असल्याने त्याची पत्नी मुलांसह माहेरीच गेली आहे. मुलगा राहुलच्या वागण्याला आई-वडील सुद्धा कंटाळल्याने वाद होत होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.