जयंत पाटील यांचा संबध नाही, ईडी प्रकरणी बॅंकेचे स्पष्टीकरण
इस्लामपूर ( सांगली) ईडीची कारवाई आणि राजारामबापू बँक यांचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही. सांगलीमधील व्यापाऱ्यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून त्या व्यापाऱ्यांची ज्या-ज्या बँकांमध्ये खाती आहेत, अशा सर्व बँकांमध्ये ईडीने जाऊन चौकशी केली आहे. राजारामबापू बँकेत ते त्यासाठीच आले असल्याचा खुलासा बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
बँकेचे व्यवस्थापक आर. ए. पाटील, कार्यकारी संचालक आर. एस. जाखले, माजी संचालक बाबुराव हुबाले, संजय पाटील, अशोकराव पाटील, अनिल गायकवाड प्रमुख उपस्थित होते. प्रा. शामराव पाटील म्हणाले, शुक्रवारी ११ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगली येथील राजवाडा शाखेत भेट दिली. त्यानंतर ते मुख्य शाखेत आले.सांगलीमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांवर जी कारवाई सुरू आहे, त्यांची खाती ज्या बँकेत आहेत त्याची माहिती घेतली जात आहे. संबंधित व्यापाऱ्यांच्या पूर्वीही तक्रारी होत्या. त्याचाच भाग म्हणून हे या तपासासाठी आले होते. याव्यतिरिक्त त्यांनी कोणतीही माहिती मागितलेली नसताना माध्यमांमधून कपोलकल्पित बातम्या दिल्या जात आहेत.आमदार जयंत पाटील यांना त्यामध्ये गोवले जात आहे. आमदार पाटील यांचा बँकेत कसलाही हस्तक्षेप नसतो. या कारवाईशी त्यांचा संबंध कसलाही नाही. त्यांचे घेऊन त्यांना व बँकेला बदनाम करण्याची बाब निषेधार्ह आहे."ते म्हणाले, "रिझर्व बँकेकडून आमच्या शेड्युल बँकेची सातत्याने तपासणी सुरू असते. काही त्रुटी आढळल्यास तत्काळ कारवाई होते. रिझर्व बँकेचे नियंत्रण असल्याने इकडेतिकडे सरकायला कसलाही वाव नाही.
आतापर्यंत राजारामबापू बँकेत कुठलीही अनियमितता आढळलेली नाही. निर्लेखित असलेली खाती, तसेच एकरकमी कर्ज परतफेड योजना व एनपीएची खाती यासंदर्भात मागितली गेलेली सर्व माहिती आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना पुरवलेली आहे. त्यांना कोणताही गैरप्रकार आढळलेला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.