लाचखोर अधिकाऱ्याला भाजपाची साथ,अनिल रामोड यांची बदली करू नका; विखे-पाटील यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
लाचखोर पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची बदली न करता त्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, असे शिफारसपत्र भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 1 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. पत्र ट्विट करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वा रे वा विखे-पाटील, असे म्हणत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दानवे यांच्या ट्विटने भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या भाजपचा बुरखा फाडला गेला आहे.
डॉ. रामोड यांच्यावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर त्यांच्याकडे 6 कोटी 64 लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. डॉ. रामोड यांना पुण्यातच अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, यासाठी 1 जूनला पत्र दिले आणि डॉ. रामोड यांना 10 जून रोजी लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात आता महसूलमंत्री विखे-पाटील यांनी डॉ. रामोड यांना मुदतवाढीसाठी दिलेली शिफारस वादात सापडली आहे.
विखे-पाटील यांचे हे शिफारस पत्र जाहीर करून अंबादास दानवे यांनी वा रे वा विखे-पाटील या शीर्षकाखाली ट्विट केले असून, त्यामध्ये पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा आठ लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री विखे-पाटील यांचे नाव समोर आले आहे. रामोड यांची बदली पुण्यातून करू नये, यासाठी विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री यांना 1 जूनला शिफारसपत्र दिले होते. त्याला एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, असे विखे-पाटील यांनी शिफारसीमध्ये म्हटल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवी कोणती अपडेट समोर येत आहे, याकडे लक्ष लागले आहे.
झेडपीचा चार्ज देण्यामागे कोण?
डॉ. अनिल रामोड यांचे कारनामे नव्याने समोर येत असताना, त्यांच्याकडे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यासाठी कुणाची शिफारस होती, हा मुद्दा नव्याने पुढे आला आहे. रामोड यांनी जिल्हा परिषदेचा पदभार घेतला. त्यांनी खातेप्रमुख अधिकाऱ्यांची बैठकदेखील आयोजित केली होती. मात्र, दुपारनंतर चार्ज पुन्हा बदलण्यात आला. पदभार देण्यासाठी आणि नंतर काढून घेण्यासाठी कोणी सूत्रे हलवली, याबद्दलची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.