सांगलीत लुटमार करणाऱ्यास अटक एक लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली: सांगली शहरात चाकूच्या धाकाने लुटमार करणाऱ्यास तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून नेणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक दुचाकी, एक मंगळसूत्र, दोन मोबाईल असा एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
आझाद बशीर शेख (वय ३६, रा. शिंदे मळा, संजयनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी चोरीतील संशयितांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली शहरचे निरीक्षक देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तशा सूचना दिल्या होत्या. पोलिसांचे पथक शहरात गस्त घालत असताना एकजण चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.पथकाने सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगलीवाडी-आष्टा रस्त्यावर एकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली. तसेच स्टेशन चौक परिसरातील एका मॉल मागे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केल्याचीही कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन मोबाईल, मंगळसूत्र असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मागर्दशर्नाखाली गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, झाकीर काझी, संतोष गळवे, गणेश कांबळे, गौतम कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.