सत्तारांचा चौथा कारनामा
माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी वारकऱयांना लाठय़ांचा प्रसाद देणाऱया मिंध्यांनी आषाढीवारीत घुसखोरी केली आहे. ऐन आषाढीला पंढरपुरात शेतकरी मेळावा घेण्याचा घाट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घातला आहे. कृषी विभाग, पोलिसांनी स्पष्ट नकार देऊनही सत्तारांनी आपले घोडे दामटले आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी राज्य सरकारने 3 कोटी रुपये मंजूर केले असले तरी सत्तारांनी अधिकाऱयांना मेळाव्याच्या नावाखाली वसुलीला जुंपल्याने संताप व्यक्त होत आहे.
शेतकरी उपाशी, मिंधे तुपाशी
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेले अवकाळीचे संकट यंदा एप्रिलपर्यंत कायम होते. अतिवृष्टी, गारपिटीने खरीप आणि रब्बी हंगामाचा चिखल झाला. या आठ महिन्यांत राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. पण शिंदे-फडणवीस सरकार फसव्या घोषणा करण्यात मश्गूल आहे. मदतीचा छदामही शेतकऱयांना मिळाला नाही. पण शेतकऱयांसाठी मेळावे घेऊन त्यावर कोटय़वधींची उधळपट्टी मात्र करण्यात येत आहे.
सरकारी माल, उडा मेरे लाल
तृणधान्य महोत्सव आणि शेतकरी मेळावा या दोन्ही कार्यक्रमांवर तब्बल 7 कोटी रुपयांची उधळण करण्यात येणार आहे. तृणधान्य महोत्सवाच्या जाहिरातीवर 75 लाख रुपये उधळण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहा दिवस व्हॅनिटी व्हॅन बोलावण्यात येणार असून त्यावर 15 लाख रुपये तर मनोरंजनावर 35 लाख रुपये खर्च होणार आहे. तृणधान्यापासून विठोबा तसेच संतमहंताच्या मूर्ती बनवण्यात येणार असून त्यावर 60 लाख रुपये खर्चण्यात येणार आहेत. कृषी पंढरी, शेतकरी मेळाव्यातील उधळपट्टी तर अचंबित करणारी आहे. सेल्फी पॉइंट बनवण्यात येणार असून त्यासाठी 6 लाख रुपये लागणार आहेत. पाण्याचे 6 हजार जार मागवण्यात येणार असून प्रत्येकी 35 रुपयांप्रमाणे त्यासाठी 21 लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. दहा पाण्याचे टँकर मागवण्यात येणार असून प्रत्येकी 8000 रुपयांप्रमाणे त्यावर 80,000 रुपये खर्च होणार आहेत. शौचालयावर 15 लाख तर फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनर्स यावर 70 लाख उधळण्यात येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.