जेव्हा यशवंतराव चव्हाण विठुरायाच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागतात...- मधुकर भावे
आषाढी एकादशी आठ दिवसांवर आली आहे. आषाढी जवळ आली की, मला गावची आठवण येते. लहाणपण आठवते. रोह्यातील ते दिवस आठवतात... आषाढीच्या आगोदर रोह्यातील विठोबाच्या देवळात सप्ताह चालायचा. आणि तो सप्ताह कसा, तर... सात दिवस एक वाद्य रात्रं-दिवस वाजत राहिले पाहिजे... विठोबाच्या मूर्तीजवळ समई तेवत राहिली पाहिजे. संध्याकाळी भजन झाले पाहिजे... आता त्याला ७७-७८. वर्ष झाली असतील. पाच-सहा वर्षांचा असताना त्या सप्ताहातील भजनाला हमखास आम्ही मित्र जायचो. गावातील ज्येष्ठ नागरिक बाबुराव गोविलकरकाका फार छान भजन म्हणायचे. आिण आम्हा मुलांकडून म्हणवून घ्यायचे. ती सगळी भजनं आजही तोंडपाठ आहेत. तो टाळ-मृदुंगाचा गजर... मनोहरअप्पा दाते यांचा तबल्यावरील ठेका. त्यांची कमालीची गरिबी... पण एकदा का तबल्यावर त्यांची थाप पडली की, विठुनामात असे तल्लिन होवून जायचे की, त्या गरिबीचा विसर पाडण्याची शक्ती त्या नामामध्ये आहे. हा मनावरचा पहिला संस्कार विठोबाच्या त्या भजन मंडळातच झाला. आम्ही मुलं रात्र-रात्र मंदिरातच काढायचो. आषाढी जवळ आली की, ते आठवायला लागतं. आमचे प्रभाअण्णा गांगल होते ते छान भजन म्हणायचे... बुवा कुंटे होते... वसंत कवितके म्हणून मित्र होता... तो टाळ छान वाजवायचा... बाबुरावांचे चिरंजीव नाना गोविलकर यांचा यात पुढाकार असायचा...
‘विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’
‘एक-दोन- तीन- चार... करू नामाचा गजर’
‘आळंदीला जाऊ... जाऊ चला...’
‘ज्ञाानेश्वर डोळा पाहू... पाहू चला....’
‘होती संतांचिया भेटी... घेवू चला...’
टाळ-मृदुंगाच्या तालातील ती भजनं आज अशी डोळ्यांसमोर येत आहेत.... कानात घुमत आहेत... मी टाळही वाजवायचो... पुढे आमच्या शेजारी राहणारे बगाराम कुर्वे हे चांगला तबला वाजवायचे... त्यांच्याकडून थोडा तबला वाजवायलाही शिकलो. पण, पुढे असं लक्षात आले की, भजन मंडळीत तबल्यापेक्षा ढोलकी किंवा नाल जास्त मजा आणते... भजनामध्ये खूप मोठे सामर्थ्य आहे. आज अनेक खेड्यांमध्ये ‘भजन- संस्कृती’ टिकून आहे. आमच्या रायगड जिल्ह्यात तर राज्य पातळीवरील स्पर्धेत ब्ाक्षिसे मिळवणारी भजन मंडळे आहेत. हरिनामाचे सामर्थ्य अफाट आहे. हा श्रद्धेचा विषय आहे. आजच्या आधुनिक काळात आणि विज्ञाान युगातसुद्धा श्रद्धेचा विषय बाद होऊ शकत नाही. आणि विठुराया असा देव आहे की, हा खरा ‘समाजवादी’ देव आहे. वारीमध्ये चालणारे वारकरी पहा... त्यांची जिद्द पहा... अनेकांच्या पायात काही नाही... काही भगिनींच्या डोक्यावर अख्खं तुळशी वृंदावन आहे. डोक्याला हात न लावता, दोन्ही हात मोकळे सोडून सपा-सप चालणे सोपे नाही. ते चालणं जरी भूमितीने तोल आणि समतोलाशी जोडले गेले असले तरी मानसिकदृष्ट्या प्रथम ते श्रद्धेशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे आळंदीहून निघालेली वारी पंढरपूरला पोहोचेपर्यंत, चालणारे दमत नाहीत. ही शक्ती येते कुठून? बाकी होम-हवन, यज्ञा-याग हे सगळं बाजूला ठेवा... आषाढीच्या वारीत श्रद्धेची आणि भक्तीची अफाट शक्ती आहे ती जगात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. जाहिरात न करता... महाराष्ट्रातील अशी लाखो कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरी ‘वारी’ आहे. ज्यांच्या घरात भजन आहे. ज्यांच्या घरात विठू-रखुमाई आहे. विणेकरी कुठेही दिसला आणि तो लहान मुलगा असला तरी, त्याच्या पायावर डोकं ठेवण्याचे संस्कार आहेत. आणि या सगळ्या संस्कारामध्ये माणसाला घडवण्याची शक्ती आहे. ‘तुळशीची माळ गळ्यात घालायची’ हे व्रत सोपे नाही. ती माळ तुटली तर नवी माळ घालण्यापूर्वी ७ दिवस उपवास करावा लागतो. ज्ञाानेश्वर माऊलींच्या ज्ञाानेश्वरीवर तुळशीची माळ ठेवून मग सातव्या दिवशी ती माळ धारण करायची असते. त्याचे पावित्र्य समजून घ्यायला पदवीची गरज नाही. विद्यापिठाची गरज नाही. श्रद्धेची गरज आहे. त्यानंतर होणारा ‘ग्यानबा-तुकारामा’चा गजर हातात टाळ घेवून एकदा करून पहा... का करायचा? असं विचारू नका... काही गोष्टींची उत्तरं नसतात.. फक्त अनुभूती असते. आणि त्या अनुभूतीमध्ये ही ताकद आहे. ज्ञाानोबा कितव्या सालातले? १२०० व्या शतकातले... तुकोबा कितव्या सालातले? १६०० व्या शतकातले... या दोन तत्त्ववेत्यांमध्ये ४०० वर्षांचे अंतर आहे. पण, ग्यानोबाला ४०० वर्षांनंतरचा तुकोबा जोडला गेला... हे भक्तीचे आणि श्रद्धेचे सामर्थ्य आहे. जगातील तत्त्ववेत्यांची एक जोडी अशी मला दाखवा.... जी ४०० वर्षांनंतर एकमेकांना जोडली गेलेली आहे... आणि घराघरांत नामस्मरणात तिचे रूपांतर झालेले आहे. हे सगळे सामर्थ्य विठुरायाचे आहे. या वर्षी पाऊस लांबला आहे. पण रोह्यातील त्या दिवसांत मला एकही वर्ष असं आठवत नाही की, आषाढी एकादशीला धुँवाधार झाली नाही.... एवढेच नव्हे तर आषाढीच्या आदल्या दिवसापर्यंत आमच्या जिल्ह्यातील भात रोपांच्या ‘लावण्या’ पूर्ण झालेल्या असायच्या. ती हिरवी रोपं... चिखलामध्ये वाकून शेतात काम करणाऱ्या भगिनी... डोक्यावरील इरली... नवीन पिढीला हे काही समजणार नाही... खेड्यांतील घरेही आता बदलली... ओटी पण गेली... आणि पडवी पण गेली... आता ‘वन बी. एच. के.’ ची भाषा रोह्यातसुद्धा आली.... पण तरीही त्या ओटी-पडवीची मजा... आषाढीच्या भजनाची मजा... ती सगळीच मजा आणि आनंद काही वेगळाच असायचा.... माझी आई शिकलेली नव्हती.... पण, संध्याकाळ झाली की, आम्हा भावंडांना देवासमोर बसवून ‘शुभंकरोती’ व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय जेवण नाही... परवचा पाठ म्हणून दाखवलाच पाहिजे.... तिला परवचा म्हणजे काही माहिती नव्हतं... एक पाव पाव... बे पाव अर्धा.... तीन पाव पाऊण... चार पाव एक....तिला पाठ होतं.... ‘व्यंकटेश स्तोत्र’ म्हणून घ्यायची....
‘अठरा भार वनस्पतींची लेखणी
आणि ही धरणी... कागद केला...’
यात म्हणताना चूक झाली तर, न शिकलेली आई स्वयंपाक घरातून ती ओळ दुरूस्त करून सांगायची... न शिकलेल्या आईने आम्हा चारही भावंडांना खूप काही शिकवलं.... भजनाला जाण्याचा संस्कार तिचाच... त्यातूनच पुढे वारीला जाण्याची संधी येताच आईची आठवण होऊनच वारीत गेलो.... बाळासाहेब भारदे विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष होते... पत्रकार होण्यापूर्वी त्यांची पहिली भेट पंढरपूरच्या मंिदरात मी विद्यार्थी असताना झाली. त्यांच्याच तोंडून विठूनामाची महती ऐकायला मिळाली. अठरा पगड जातीतल भक्त म्हणजे काय? हे त्यांच्याच तोंडून समजलं.... संत म्हणजे काय? हे त्यांनी निरूपण करून सांगितलं... ज्ञाानोबा-तुकोबा ही नावं माहिती होती.... पण, नामदेव महाराज, चोखोबा महाराज... सावता महाराज... गोरा कुंभार महाराज .... नरहरी महाराज... जनाबाई.... रोहिदास महाराज... या संतांची ओळख भारदे साहेबांच्या प्रवचनातूनच झाली. एक एक संत म्हणजे एक एक विद्यापीठ होते. भारदे साहेब म्हणायचे की, ‘एका संतांचा अभ्यास करायचा तर, एका हयातीचे ते काम आहे....’ या संतांची जात कोणी विचारली नाही... त्यांचे शिक्षण विचारले नाही... पण, त्यांच्या तत्त्वज्ञाानातून महाराष्ट्राचे जे प्रबोधन झाले ते कोणत्याही विद्यापीठातूनही झाले नसते...
मडकी भाजणारे गोरोबा... भाजलेल्या मडक्यावर त्यावेळचा ‘ढबू’ हातात घेवून मडकं पक्क की कच्च, हे वाजवून बघू लागले... आणि त्यांच्या मनात आले की, ‘अरे, मी मडकं कच्च की पक्क बघतोय... आणि डोक्यावर त्यांनी ढबू आपटला... अरे, हे अजून कच्चंच आहे... ’ इथं त्यांना तत्त्वज्ञाान झालं... सावता माळी महाराज बागेतील तण उपटताना आपल्या डोक्यात अविचाराचे किती तण आहेत, ही भाषा बोलू लागले. सेनामहाराज दुसऱ्यांच्या डोक्यावरचे केस काढताना माझ्या डोक्यात अविचारांची किती घाण आहे, ही तत्त्वज्ञाानाची भाषा बोलू लागले... हा त्यांचा केवळ प्रज्ञाावाद नव्हता... हे जीवनाचे तत्त्वज्ञाान होते. आणि कुठल्याही विद्यापीठात न जाता महाराष्ट्राच्या अठरा पगड जातीतील या संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात सगळ्याच जाती गाडून टाकल्या. सगळ्यांचा धर्म एकच... जात एकच... आणि भागवत धर्माची पताका एकच... मुखामधील विठू नाम एकच... आणि मग तो विठूही इतका भोळा आणि भक्तांना पावणारा तो चोखोबोची गुरं राखायला आला. जनीच्या घरी पाणी भरायला आला... पुंडलिकाच्या भेटीला गेला... पण, आई-वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाने त्या विठुरायालाही, हातातील सवेचे काम सोडून लोटांगण न घालता, विटेवर उभे करून ठेवले आहे! माता-पित्याच्या सेवेपेक्षा अधिक श्रेष्ठ काही नाही, हा संदेश पुंडलिकाने दिला. आणि तिच परिक्षा पहायला साक्षात पांडुरंग आला होता. त्यामुळेच त्याचे कौतुक पहात आमचा विठ्ठलही विटेवर उभा राहिला....ही सगळी संत परंपरा महाराष्ट्राचे वैभव आहे.आषाढीसाठी लाखो लोक पंढरपूरच्या वाटेने चालत आहेत... त्यांची व्यवस्था होओ.... न होओ... त्यांना दर्शन मिळो... न मिळो... कळसाला नमस्कार करून पुन्हा, शेकडो मैल चालत परत येणारा आणि जगण्याची उमेद घेवून येणारा, त्याच्या त्या श्रद्धेचे आणि भक्तीचे मोल कोणत्या तागडीत आपण तोलणार.... आषाढी एकादशी आणि विठुरायाचे श्रद्धास्थान याची ताकद या सामान्य माणसाला त्यातूनच मिळालेली आहे. म्हणून भागवत धर्माची पताका हजारो वर्षे अशी फडकत राहिली. आळंदी ते पंढरपूर हजारो माणसं चालत राहिली.महाराष्ट्राचा हा भक्तीचा मोठा गजर आहे. श्रद्धेचा उत्सव आहे. वर्षानुवर्षे तो चालत आहे. त्या दिवशी उपवास करायचा आहे. २७ एकादशी आणि आषाढी-कार्तिकी आणि महाशिवरात्री वर्षातून ३० दिवसांचे उपवास आहेत. ते श्रद्धेशी जोडले गेलेले आहेत. पण त्याचा मूळ उद्देश शरीरशुद्धीशी आहे. पण, आपण हे सगळं विसरलो आहोत आणि त्या दिवशी इतर दिवसांपेक्षा जास्त खात आहोत. तीर्थ यात्रेला जातानाही चाकाट्या पिटण्याचे नवीन खूळ आलेले आहे... ‘सेल्फी’ काढण्यात आम्ही धन्यता मानतो. जणू एखाद्या सहलीला निघालो आहोत, अशी अनेकांची भावना आहे. पण तो चालणारा वारकरी या सगळ्या आजच्या नवीन जगाला न भूलता, तो अखंड चालत आहे... विठुनामाचा गजर करत चालत आहे... महाराष्ट्राचं हे श्रद्धेचं अफाट वैभव आहे. आणि यात फाटका गरिब माणूस आहे... श्रीमंत माणसांचा हा देवच नाही... खऱ्या अर्थाने विठूराया समाजवादी देव आहे. सामान्य माणसं चंद्रभागेच्या वाळूत लोटांगण घालून त्याचं दर्शन घेवून निघाली की, त्यांना हत्तीचे बळ येत आहे... आषाढी एकादशीची ही ताकद आहे....आज चंद्रभागा कोरडी पडली आहे. दुष्काळाचे सावट आहे. खुद्द उजनी धरणही - २६ टक्के पाणीसाठा असलेल्या उजनी धरणातील पाणी चंद्रभागेत सोडून, भक्तांच्या स्नानाची व्यवस्था होईल... कारण उजनी धरण निर्माण झाले तेच मुळी चंद्रभागा अडवून... आणि आज त्यामुळेच यशवंतराव चव्हाणसाहेबांची आठवण येते... मी किती भाग्यवान समजतो... तो दिवस आठवतोय... ७ मार्च १९६६ रोजी उजनी धरणाच्या भूमीपूजनाला त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव जाणार होते. मी ‘मराठा’त मुख्य वार्ताहर होतो. उजनीला जाण्यापूर्वी यशवंतरावसाहेब म्हणाले, ‘पत्रकार मित्रा, उजनीच्या भूमीपूजनाला येतो का? गप्पा मारत जाऊ....’ केवढं मोठं भाग्य आहे... चव्हाणसाहेबांच्या बरोबर निघालो... आणि प्रथम पंढरपूरला गेलो... मी म्हटलं, ‘साहेब, उजनी इंदापूरकडे आहे...’ ते समजले... ते म्हणाले, ‘अरे मित्रा, आपण चंद्रभागा अडवायला निघालो आहोत... भक्तांच्या स्नानालाली पाणी राहणार नाही... म्हणून पहिल्याप्रथम पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून त्याची क्षमा मागितली पाहिजे... उजनीचा खटाटोप आपण सामान्य शेतकऱ्यांसाठी केला असला तरी चंद्रभागेचं पाणी आपण आडवलं आहे...’ शपथेवर सांगतो... ते सगळं आठवलं की, आजही अंगावर काटा येतो... पंढरपूरच्या मंदिरात आम्ही गेलो... यशवंतरावसाहेबांनी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवले.... त्याची क्षमा मागितली... आणि मग उजनीच्या भूमीपूजनाला प्रस्थान झाले... बाळासाहेब भारदेही तेव्हा तिथे होते... पुढे १४ वर्षांनी उजनी धरणाचे उद्घाटन वसंतदादा पाटील यांच्या हस्ते जून १९८० मध्ये झाले आणि सोलापूरचे आमदार म्हणून सुशीलकुमार शिंदेही त्यावेळी उपस्थित होते.
आज त्याच उजनीचे पाणी चंद्रभागेत सोडले जात आहे.. विठुरायाच्या भक्तांना स्नानाची व्यवस्था होईल... पण, विठुरायाकडे एकच मागणं आहे... चंद्रभागेत उजनीचे पाणी सोडायची वेळच येऊ नये... अशी व्यवस्था मृगापासून पाऊस सुरू होऊन विठुरायालाच करणे शक्य आहे.. आणि म्हणून त्याच पावसासाठी आजच्या दिवशी प्रार्थना... आणि यशवंतरावांसारखी महाराष्ट्राची बांधणी करणारी नेतेमंडळी आज नाहीत, यामुळे कुरतडून जाणारे मन... या महाराष्ट्राला आता विठुरायानेच सांभाळावे... आणि सन्मार्गावर आणावे....
ही आषाढीची प्रार्थना...
सध्या एवढेच...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.