Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुठेही जा, सत्तारांचीच मालमत्ता, आलिशान बंगले, फार्महाऊस, मॉल

कुठेही जा, सत्तारांचीच मालमत्ता, आलिशान बंगले, फार्महाऊस, मॉल


घोटाळ्यांचे बेताज बादशहा असलेले अब्दुल सत्तार यांनी सत्ता आणि गुंडगिरीच्या नावावर अख्ख्या सिल्लोडचा सातबाराच आपल्या नावावर करून घेतला आहे! सिल्लोडात कुठेही जा… सत्तारांचाच माल अन् मत्ता! आलिशान बंगले, शॉपिंग कॉम्प्लेक्स, फार्महाऊस, मॉल, शाळा… डोके वर करून बघितले तर टोपी खाली पडावी असा टोलेजंग विकास! पण कुंपणानेच शेत खाल्ले! पत्नी, मुलगा, भाऊ, शोधून शोधून काढलेले नातलग यांच्या नावावर असलेल्या या मालमत्तांची सरकारदफ्तरी नोंदच नाही! माहितीच्या अधिकारात विचारले की सिल्लोडातील अधिकारी 'या मालमत्तांची सरकार दफ्तरी नोंद नाही' असे छापील उत्तर देतात. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सत्तारांच्या ओंजळीने पाणी पित असल्याने करण्यात आलेल्या तक्रारीच्या कागदांना वाळवी लागली… पण तक्रारदारांना न्याय मिळाला नाही!

लहान मुलांची बागच बळकावली

सिल्लोडच्या गावठाणमध्ये गट क्र. 116 मध्ये लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चिल्ड्रन पार्कसाठी जागा शहर विकास आराखडय़ात आरक्षित करण्यात आलेली होती. सत्तारांची नजर या जागेवर पडली. कायद्याची वरात काढत सत्तारांनी त्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता बेकायदा बांधकाम केले.

कोर्ट क्वार्टरच्या जागेवरही कब्जा

गट क्र. 18 आणि 19 मध्ये कोर्ट क्वार्टरसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. कोर्ट आरक्षण क्र. 92 आणि गार्डन आरक्षण क्र. 91 अशा या जागांवर सत्तारांनी कब्जा केला. गट क्र. 299 मधील 'रामा रेसिडेन्सी' हा गृहप्रकल्प असाच बेकायदा उभा राहिला. या गृहप्रकल्पासाठी सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे स्पष्ट झाल्याने हे संपूर्ण बांधकाम बेकायदा ठरले आहे. पण तक्रारीला कुठेही दाद मिळत नाही. कारण तक्रार केली तरी सत्तार सुनावणीच होऊ देत नाहीत. त्यामुळे अनेक तक्रारदार सरकार दरबारी खेटय़ा घालून शेवटी वैतागून हतबल झाले.

ग्रामपंचायतीत नोंदच नाही

सिल्लोड तालुक्यातील दहिगावमध्ये गट क्र. 35 मध्ये एकरभर जागेवर टोलेजंग बंगला बांधण्यात आला आहे. शेख सत्तार शेख बेगू आणि अब्दुल आमीर अब्दुल सत्तार यांच्या नावावर हा बंगला आहे. मात्र ग्रामपंचायतीत या बंगल्याची नोंदच नाही! यासंदर्भात 2 ऑगस्ट 2021 रोजी माहितीच्या अधिकारात माहिती विचारण्यात आली होती. त्याला 23 ऑगस्ट 2021 रोजी ग्रामपंचायतीने उत्तर दिले असून अशी कोणतीही नोंद आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. सोयगाव शहराच्या हद्दीत प्रगती उर्दू हायस्कूल आणि नॅशनल मराठी हायस्कूलची भव्यदिव्य इमारत आहे. या इमारतीची आपल्याकडे कोणतीही नोंद नसल्याचे नगर पंचायतीने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.

वकील बाजूच मांडत नाही…

2011 मध्ये सिल्लोड नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अब्दुल सत्तार यांच्या अनधिकृत बांधकामांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला. देशभ्रतार यांनी वेगवेगळ्या कारणांवरून 100 पेक्षा जास्त बांधकामे अनधिकृत ठरवली. हे प्रकरण न्यायालयात गेले. 2011 पासून ते आतापर्यंत सिल्लोड नगर परिषदेच्या वकिलाने फक्त तारखा वाढवून घेतल्या. या प्रकरणात कधीही बाजू मांडली नाही. त्यामुळे सत्तारांच्या अनिर्बंध कारभाराचा पसारा वाढतच गेला.

कोटय़वधींच्या मालमत्तांची नोंदच नाही!

अब्दुल सत्तार यांनी सत्तेचा दंडुका वापरून जागांवर कब्जा केला. त्यावर आलिशान बंगले, शाळा, फार्महाऊस, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले… पण सरकार दरबारी त्यांची नोंदच होऊ दिली नाही. विशेष म्हणजे सत्तारांच्या या मालमत्तांपैकी अनेक बांधकामे विनापरवानगी आहेत. इनामी जमिनींचे व्यवहार करताना शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. बहुतेक मालमत्तांचे सक्षम अधिकाऱयाकडून रेखांकन करण्यात आलेले नाही. दहिगाव रोडवर खलील बागवान यांच्या नावाने गट क्र. 75 मध्ये आलिशान बंगला आहे. या बंगल्याचे बांधकाम परवानगी पेक्षा जास्त करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.