Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपघातग्रस्त गाडीच्या चालकाचे लायसन्स कालबाह्य झाले तरी विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील!

अपघातग्रस्त गाडीच्या चालकाचे लायसन्स कालबाह्य झाले तरी विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील! 


अपघातग्रस्त गाडीच्या चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स कालबाह्य झाले असले वा लायसन्स नूतनीकरण केले नसले तरी अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास विमा कंपनी जबाबदार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. केवळ लायसन्स नूतनीकरण केले नाही म्हणून त्या चालकाला अकुशल चालक म्हणता येणार नसल्याचे न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांनी एका प्रकरणात स्पष्ट केले.

नोव्हेंबर 2011 मध्ये अपघातात प्राण गमावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स पंपनीला दिला. नोव्हेंबर 2011 मध्ये आशा बाविस्कर ही महिला दुचाकीवरून पुण्यातील हडपसरकडे जात होती. याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात महिलेचा ट्रकखाली येऊन जागीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबीयांना ट्रक मालकाने नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाने दिला होता. तथापि, अपघातग्रस्त गाडीच्या चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स कालबाह्य झाल्याच्या आधारे विमा कंपनीला नुकसानभरपाई देण्यापासून मुक्त केले होते. मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाच्या या आदेशाला महिलेच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांनी निर्णय देताना महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने विमा कंपनीला सहा आठवडय़ांत मृत महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

न्यायालय काय म्हणाले?

* भरधाव ट्रकने महिलेच्या दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात घडला, त्यावेळी ट्रकचा विमा उतरवला होता. त्यामुळे मृत महिलेच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यासाठी विमा कंपनीचीच पंत्राटी जबाबदारी होती.

* घटनेच्या वेळी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या गाडीच्या चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण केले नव्हते. याचा अर्थ असा होत नाही की तो चालक अकुशल होता.

* अपघातग्रस्त गाडी चालकाकडे वैध किंवा प्रभावी ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सर्वप्रथम विमा कंपनीने भरपाई देणे बंधनकारक आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.