इनाम धामणित भिंत पडून उमळवाडचा युवक ठार
सांगली : मिरज तालुक्यातील इनाम धामणी येथे भिंत पडून उमळवाड (ता. शिरोळ) येथील युवक ठार झाला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान मृत युवकाच्या नातेवाईकांनी सांगली सिव्हिलमध्ये गोंधळ घातला त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आदित्य कपूर कोळी (वय 17) असे मृत युवकाचे नाव आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची नावे समजू शकली नाहीत. आदित्य तसेच जखमी तरुण एका केटरर्सकडे काम करतात. आक गुरुवारी ते त्याच कामासाठी इनाम धामणी येथे आले होते. काम संपल्यानंतर ते परत जात असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी ते पावसापासून बचाव करण्यासाठी इनाम धमणितील एका मंगल कार्यालयाजवळ असलेल्या भिंतीच्या आडोशाला थांबले होते. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने ती भिंत कोसळली. त्या भिंतीखाली तिघेही सापडले.
सायंकाळी पाऊस थांबल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी ग्रामस्थ आणि अन्य लोकांनी त्यांना तातडीने सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे आदित्यचा मृत्य झाल्याचे डॉक्टरानी जाहीर केले. या घटनेची माहिती मिळताच आदित्यच्या नातेवाईकांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.