इनामी जमिनीतही अब्दुल सत्तारांची बेइमानी!
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतः चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सीमेवर रक्षण करणाऱ्या योगेश गोरडे या जवानाचा भूखंड गिळल्याचे प्रकरण ताजे असतानाच याच मेडिकल कॉलेजसाठी देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकालाही त्यांनी सोडले नाही. स्वातंत्र्यसैनिक सय्यद करीमोद्दीन यांना शासनाकडून मिळालेली इनामी जमीनही सत्तारांनी गिळंकृत केली. सत्तारांनी गिळलेल्या जमिनीपैकी सव्वा एकर जमिनीचा फेर रद्द करण्याचे आदेश काढणारे उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांना अवघ्या चार तासांत सत्तारांनी बदली करून सिल्लोडबाहेर हाकलले होते.
सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागे गट क्र. 92 मध्ये इ.स. 2007 मध्ये नॅशनल एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात आली. या सोसायटीत अप्पाराव गिरजाराम गोरडे यांचा 85 क्रमांकाचा 1300 चौरस फुटांचा प्लॉट आहे. अप्पाराव यांच्या लष्करात असलेल्या योगेश या मुलाने हा प्लॉट खरेदी केला. मेडिकल कॉलेजसाठी अब्दुल सत्तारांनी ही संपूर्ण सोसायटीच बळकावली आहे. मात्र गोरडे कुटुंबाने आपला प्लॉट देण्यास नकार दिला. त्यानंतर सत्तार गँगने गोरडे यांचा भयंकर छळ केला. सरकार दरबारी खेट्या घालूनही गोरडे कुटुंबाला अद्यापही न्याय मिळाला नाही. सत्तारांच्या या कारनाम्याची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू असतानाच आता स्वातंत्र्यसैनिक सय्यद करीमोद्दीन यांचीही सर्व्हे क्र. 90 मधील 8 एकर 5 गुंठे जमीन अशीच धाकदपटशा दाखवून सत्तारांनी बळकावल्याचे समोर आले आहे. या जमिनीचा व्यवहार करताना सत्तारांनी महसूल बुडवून शासनालाही लाखो रुपयांना चुना लावला.
असेच जमिनीचे दुसरे प्रकरण…
सिल्लोडच्या यशवंतनगरातील साहेबखान पठाण यांच्या वडिलांची गट क्र. 92 मध्ये तीन एकर जमीन होती. यापैकी सव्वा एकर जमीन साहेबखान यांच्या नावावर होती. सदरील जमीन ही इनामी असून त्याची मालकी सरकारकडे आहे. 1995 मध्ये साहेबखान यांनी अब्दुल समद यांच्याकडून ८० हजार रुपये उसनवारीवर घेतले. यासाठी गहाण म्हणून त्यांनी आपल्या जमिनीची रजिस्ट्री समद यांच्या नावाने करून दिली होती. ठरलेल्या मुदतीत साहेबखान यांनी 80 हजार रुपये परत केले. त्यावेळी तोंडी हिबानामा करण्यात आला. विश्वासामुळे साहेबखान यांनी रजिस्ट्री रद्द केली नाही. साहेबखान यांच्या जमिनीची रजिस्ट्री समद यांच्याकडे असल्याचे कळताच अब्दुल सत्तार यांनी समद यांना बोलावून आर्थिक व्यवहार केला. अवघ्या 15 दिवसात तहसीलदारांना हाताशी धरून तब्बल 27 वर्षानंतर अब्दुल समद यांचे नाव लावून घेत सदरील सव्वा एकर जागा बक्षीसपत्राआधारे नॅशनल सोसायटीच्या नावाने केली.
सहायक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल
साहेबखान पठाण यांच्या सातबाऱ्यावर अब्दुल समद यांच्या नावानंतर नॅशनल सोसायटीचे नाव लागल्याचे लक्षात येताच शफीक साहेबखान पठाण, शकील आणि सुलतान पठाण या तिघा भावांनी मुखत्यारआम गणेश शंकरपेल्ली यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले.
अपील विरोधात जाताच अधिकाऱ्याला हाकलले
सिल्लोडचे तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्यासमोर हे अपील सुनावणीसाठी आले. 9 मे 2023 रोजी जंगम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत सव्वा एकर जमिनीचा फेर रद्द करून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. जंगम यांनी फेर रद्द करण्याचा निकाल देताच त्यांची अवघ्या चार तासात देगलूरला बदली करण्यात आली. जंगम यांच्यापूर्वी सात वर्षाच्या कालावधीत सत्तार यांनी तब्बल 17 उपविभागीय अधिकाऱ्यांना सिल्लोडातून अतिशय अपमानास्पद पद्धतीने हाकलले आहे. जंगम यांच्या जागेवर सत्तार यांनी आपले पूर्वीचे स्वीय सहायक लतीफ पठाण यांना आणून बसवले. त्यानंतर सत्तार यांनी अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडे अपील करून एक दिवसात जंगम यांच्या निर्णयाला स्थगिती मिळवली. गव्हाणे यांच्याकडील सुनावणी मूळ प्लॉटधारकांच्या माघारीच करण्यात आली.
सत्तारांनी दोन पीएंना धूधू धुतले…….
मेडिकल कॉलेजच्या सव्वा एकर जमिनीचा फेरफार रद्द केल्याचे कळताच सत्तारांनी सिल्लोड गाठले. विशेष म्हणजे महसूल विभागाची जबाबदारी सांभाळणारा त्यांचा पीए वसीम आणि तहसील विभागाची जबाबदारी सांभाळणारा पीए बबलू या दोघांना एका घरात कोंडून सत्तार व त्यांच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर वसीमला सोयगावच्या शाळेवर, तर बबलूला सावळदबाऱ्याच्या शाळेवर पाठवण्यात आले.
जमिनी वेगवेगळ्या… पण सातबारा मात्र एकच !
अब्दुल सत्तार यांच्या स्वप्नातील मेडिकल कॉलेजचे इमले गट क्र. 90, 91 आणि 92 मधील जमिनीवर रचण्यात येणार आहेत. या तीनही गट क्रमांकातील जमिनी वेगवेगळ्या मालकांच्या नावावर आहेत. गट क्र. 92 मध्ये मोहंमद वारीस यांच्या जमिनीवर 205 प्लॉट पाडण्यात आले. त्यापैकी साधारण 60 प्लॉटचे दानपत्र सत्तारांनी दंडेलीने करून घेतले आहे. नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून बळकावण्यात आलेल्या या मालमत्ता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यांच्या चतुःसीमा वेगवेगळ्या आहेत; परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे महसुली अधिकाऱ्यांचा तोबरा भरून त्याचा सातबारा मात्र एकच दाखवण्यात आला आहे!
लष्करी जवान योगेश गोरडे याने आपला प्लॉट अब्दुल सत्तार यांनी बळकावल्याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. सत्तार यांच्या दहशतीमुळे प्रशासनाने त्याच्या तक्रारीकडे बघितलेही नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना विचारले असता त्यांनी अगोदर 'नो कॉमेंट्स' असे उत्तर दिले. मात्र नंतर या संपूर्ण प्रकरणाकडे माझे लक्ष असून लष्करी जवानावर अन्याय होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.