सांगलीत सिव्हिलजवळ फायरिंग !
सांगली : सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसर शनिवारी रात्री हादरून गेला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून या परिसरात कोणीतरी फायरिंग केल्याची चर्चा आहे. दरम्यान त्याच परिसरातील काही नशेबाज वाद घालत असताना मध्यस्थी केल्याच्या कारणावरून एका नगरसेवकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी त्या नगरसेवकाने फायरिंग केल्याचे समजते.
सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलला लागून एक झोपडपट्टी आहे. या परिसरात नशेबाजांचा वावर असतो. शिवाय शंभर फुटी राडत्यावरील काही नशेबाज या परिसरात फिरत असतात. शनिवारी रात्री त्या नशेबाज मुलांशी संबंधित नगरसेवकाच्या एका कार्यकर्त्याचा वाद झाला. त्यानंतर त्या कार्यकर्त्याचा शोध घेत नशेबाज काही साथीदारांना घेऊन सिव्हिल हॉस्पिटल जवळ असलेल्या नगरसेवकाच्या हॉटेलसमोर पोहोचले.
तेथे वाद सुरू असल्याने संबंधित नगरसेवक तेथे गेले. त्यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित नगरसेवकाने फायरिंग केल्याची चर्चा आहे. घटना घडल्यानंतर सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस घटनेची माहिती घेत आहेत.
हा प्रकार नेमका कशातून घडला तसेच नेमके कोणी फायरिंग केले याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.