दर्शनाचा मारेकरी निघाला तिचाच बालमित्र, डिलिव्हरी बॉयचे काम करून एमपीएससी करायचा
राजगड किल्ल्याच्या पायथ्याला एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाला होता. या खुनाचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी राहुल हंडोरे या तरुणाला अटक केली आहे. त्याने खून केल्याची कबुली दिली. राहुल हंडोरे हा दर्शना पवारचा बालमित्र आहे. लग्न करण्यास नकार दिल्याने त्याने ही कृत्य केल्याची कबूली दिली.
आरोपी राहुल हंडोरे आणि दर्शना पवार हे बालपणीचे मित्र होते. दर्शनाच्या मामाचे घर आणि राहुल हंडोरेचं घर समोरासमोर आहे. दर्शना मामाच्या गावी गेल्यानंतर तिची राहुल सोबत बालपणीच ओळख झाली होती. दोघे चांगले मित्र होते. दर्शना ज्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तसाच राहुल ही तयारी करायचा. मागील काही वर्षापासून तो पुण्यात राहायचा. त्याने पार्ट टाइम जॉब करून स्पर्धा परीक्षा देखील दिली आहे.
सध्या तो फूड डिलिव्हरीचा काम करून पुण्यातच एका खोलीत राहायचा आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. मात्र दर्शना परीक्षेत पास झाली आणि राहुल पाठीमागेच राहिला. स्पर्धा परीक्षेत पास झाल्यानंतर घरात दर्शनाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र राहुलला दर्शनासोबत लग्न करायचं होतं. तिचा मात्र लग्नाला नकार होता..त्यामुळे राहुलने रागाच्या भरात दर्शनाचा खून केला असावा असा संशय पोलिसांना आहे.
स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शनाचा पुण्यात सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्कार नंतर राहुल आणि दर्शना ट्रेकिंग साठी राजगड किल्ल्यावर गेले होते. मात्र त्या ठिकाणी राहूलने दर्शनाला लग्नासाठी विचारणा केली. दर्शनाने त्याला नकार दिल्यानंतर दोघात भांडण झाले असावेआणि त्याने दर्शनाचा खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. खून केल्यानंतर राहुलने रेल्वेने लांबचा प्रवास केलाय. बुधवारी रात्री तो अंधेरी रेल्वे स्टेशन येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.