हरित क्रांतीचे जनक : राजर्षी शाहू महाराज
भारतात 1967 मध्ये हरित क्रांती घडून आली. विशेषत: पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये गहू आणि उसाचे प्रचंड उत्पादन झाले. डॉ. बॉरालॉग यांनी शोधून काढलेल्या 'कल्याण सोना' या नावाच्या गव्हाच्या जातीपासून पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांत गव्हाचे उत्पादन इतके प्रचंड झाले की, तो गहू ठेवण्यास गोदामे अपुरी पडू लागली. तर महाराष्ट्रामध्ये साखर आणि गूळ या दोन्ही जीवनावश्यक वस्तूंची विक्री करून महाराष्ट्राच्या काही भागांत शेतकर्यांचा नवीन श्रीमंत वर्ग तयार झाला. परंतु, या हरित क्रांतीची बिजे प्रथम शाहू छत्रपतींनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 1908-09 ला रोवली होती.
आज (सोमवार) जयंतीनिमित्त महात्मा फुले यांनी शुद्रातिशुद्रांच्या सर्वांगीण मुक्तीसाठी चालू केलेली सामाजिक समता आणि सर्वांगीण स्वातंत्र्याची विचारपरंपरा आता खंडित होते की काय, अशी संभ-मावस्था निर्माण झाली होती. सामाजिक चळवळ पोरकी झाली होती. परंतु, सामाजिक चळवळीचे हे पोरकेपण फार काळ टिकले नाही. कारण, 2 एप्रिल 1884 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीचे अधिकार आपल्या हाती घेतले आणि शाहूराजे खर्या अर्थाने त्या दिवशी कोल्हापूरचे छत्रपती झाले. 3 एप्रिल 1894 रोजी शाहू छत्रपतींनी आपल्या रयतेस लोककल्याणाची पूर्ण हमी देणारा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मध्यंतरी पेशवाईत बंद केलेला राज्याभिषेक शक त्याचवेळी त्यांनी पुन्हा सुरू करून लोकनेते शिवछत्रपतींची स्मृती सदैव जागृत राहील, याची व्यवस्था केली.राजर्षी शाहू छत्रपती जेव्हा गादीवर आले, तेव्हा कोल्हापूर संस्थानामधील राज्यकारभाराची घडी पूर्ण विस्कटून गेली होती. शाहू छत्रपतींनी हळूहळू आपल्या विचारांची, ध्येयधोरणांची आणि विश्वासाची अधिकारी मंडळी नेमण्यास सुरुवात केली. विशी ओलांडलेले शाहू छत्रपती वरील अधिकारी मंडळींच्या मदतीने मोठ्या आत्मविश्वासाने राज्यकारभार चालवू लागले. शाहू छत्रपती कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले आणि अवघ्या 2-3 वर्षांतच म्हणजे, 1897 साली भारतात फार मोठादुष्काळ पडला. या दुष्काळात देशभर माणसे आणि जनावरे यांचे लाखोंनी बळी गेले. कोल्हापूर संस्थानामध्येही या दुष्काळाच्या झळा पोहोचल्या होत्या. परंतु, शाहू छत्रपतींनी अनेक उपायांची योजना करून हा दुष्काळ मोडून काढला. दुष्काळग्रस्तांसाठी केवळ स्वस्त दुकाने आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून दुष्काळावर मात करता येत नाही, तर लोकांनी या वस्तू विकत घ्याव्यात म्हणून त्यांच्या हातात रोख पैसा काही प्रमाणात देणे आवश्यक असते. म्हणजेच त्यासाठी प्रजेच्या हातात रोख पैसा पडेल, याची व्यवस्था करणे भाग असते. शाहू छत्रपतींनी त्यासाठी विविध रस्ते आणि त्यावरील पूल यांची कामे संस्थानमध्ये सुरू करून लोकांना रोजगार पुरविला. 1896-97 मध्ये शाहू छत्रपतींनी रस्ते बांधणीवर चाळीस हजारांहून अधिक खर्च केले. तर 1897-98 मध्ये हातकणंगले ते वडगाव, वडगाव ते कोडोली, शिरोळ रेल्वे स्टेशन ते उदगाव, तारदाळ ते हातकणंगले, कटकोळ ते मनोली आणि मनोली ते मुनाळ असे 75 मैलांचे नवीन रस्ते तयार करण्यात आले. या रस्त्यांसाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्च केले होते. 1899-1900 मध्ये शाहू छत्रपतींनी निपाणी-फोंडा असा चांगला पक्का रस्ता बांधण्यास सुरुवात केली.वृद्ध, रोगपीडित आणि अपंग-दुर्बल लोकांसाठी कटकोळ, पन्हाळा, बांबवडे, बाजारभोगाव, गारगोटी, वळिवडे, तिरवडे गडहिंग्लज आणि कोल्हापूर शहर या ठिकाणी आश्रम उघडून सुमारे पन्नास हजार लोकांची सोय केली. त्याही पुढे जाऊन ज्यांना आपल्या शारीरिक दुर्बलतेमुळे घराबाहेर पडणे शक्य नव्हते, त्यांच्या घरी शिधा पोहोचविण्यास शाहू छत्रपती विसरले नव्हते! रस्ते किंवा इतर बांधकामात गुंतलेल्या स्त्रियांच्या लहान मुलांसाठी पाळणागृहेही शाहू छत्रपतींनी सुरू केली होती. शेतकर्यांना, तगाई कामगारांना दुष्काळी भत्ता देण्याची व्यवस्था केली. थोडक्यात, सुमारे 125 वर्षांपूर्वी शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानामध्ये दुष्काळाच्या काळात रोजगार हमी योजना राबवून लोकांचे जगणे सुसह्य केले होते.दुष्काळात लोकांना पिण्याचे पाणीही मिळणे महामुश्कील होऊन बसले होते. शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानातील मुजलेल्या आणि आटलेल्या विहिरींचा शोध घेऊन त्यामधील गाळ काढण्याची व्यवस्था करून त्या विहिरी अधिक पाणीदार केल्या! 1896-97 च्या या महाभयंकर दुष्काळात संपूर्ण देशात 10 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. परंतु, कोल्हापूर संस्थानात मात्र एकही भूकबळी पडलेला नव्हता. शाहू छत्रपतींनी सर्वस्व पणाला लावून महादुष्काळाशी दिलेल्या लढतीचे ते अपूर्व यश होते! शेतीसंबंधी चहा-कॉफीसारखी पैशाची पिके घेण्याचा अभिनव प्रयोग शाहू छत्रपतींनी पन्हाळा आणि भुदरगड भागात राबविलेला दिसून येतो. शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानातील शेतीला कायमचा पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाणी पुरवठ्याच्या लहान-मोठ्या योजना कार्यवाहीत केल्या होत्या.
1905-1906 या कालावधीत 1700 इतकी विहिरींची संख्या होती ती 1920-21 या वर्षात 12800 इतकी झाली. जुन्या विहिरी दुरुस्त करण्यासाठी शेतकर्यांना तगाईच्या रूपाने कर्जपुरवठा करण्यात आला. त्याचप्रमाणे शिरोळ, रायबाग, शहापूर, रूकडी या ठिकाणी 20 हून अधिक तलाव बांधण्यात आले. 1902 मध्ये शाहू छत्रपतींनी इंग्लंड आणि युरोपमधील इतर काही देशांना भेटी दिल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या मनात राधानगरी धरणाने अधिक जोर घेतलेला दिसतो. नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचे सल्ले घेऊन, भोगावती नदीवर मोठे धरण बांधण्याचा शाहू छत्रपतींनी ठाम निर्णय घेतला.
धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष 1909 मध्ये आरंभ झाला. 1914 साली या धरणाच्या बांधकामाचा खर्च 9 लाख रुपये इतका झाला होता. तो खर्च 1917-18 मध्ये 13 लाख 36 हजार इतका झाला. या धरणाच्या पाण्यातून कोल्हापूर जिल्ह्यात हरित क्रांती घडून आली. लोकांना बारामाही मुबलक पाणी उपलब्ध झाले. शाहू छत्रपतींचे कोल्हापूर संस्थान सुजलाम्-सुफलाम् करण्याचे स्वप्न साकार झाले. म्हणूनच ते आपल्या पत्रातून अनेकदा म्हणत होते, "My life's work will have been done when I complete this project.'' – हा धरण प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा खर्या अर्थाने माझे जीवितकार्य पूर्ण होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.