अनिकेत कोथळे याचा डीएनए अहवाल न्यायालयात सादर
सांगली : अनिकेत कोथळे खून प्रकरणी तपास अधिकारी आणि तत्कालीन सीआयडी चे पोलीस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी कोथळे यांचा डी.एन.ए. अहवाल आज न्यायालयासमोर सादर केला. दरम्यान बचाव पक्षाचे वकील विकास पाटील तसेच विशेष सरकारी वकील उज्वल निकम आणि तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्यात उलट तपासा दरम्यान जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली.
अनिकेत कोथळे खून प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मलाबादे यांच्या न्यायालयात खटल्याचे काम सुरू झाले. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तपास अधिकारी तथा तत्कालीन सीआयडी पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांचा सरतपास नोंदवला. त्यामध्ये त्यांनी खालील बाबी न्यायालया समोर सादर केल्या. त्यामध्ये अनिकेतच्या आई-वडिलांच्या परवानगीने डीएनए टेस्ट साठी घेतलेले रक्ताच्या नमुनाचे अहवाल याचा समावेश होता .
खुनात सहभागी असलेल्या आरोपींनी ज्या गाडीतून अनिकेतचा मृतदेह नेला त्या एम. एच. १० सी एन 0832 क्रमांकाच्या सेलेरिओ कार चे कोगनोळी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले ते न्यायालयास आज सादर करण्यात आले. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून हीस्टो पॅथॉलॉजी ( ऊती शास्त्र) त्याचप्रमाणे एनोटॉमी ( शरीरशास्त्र) अहवाल सुद्धा न्यायालयास आज सादर करण्यात आले.
खून प्रकरणाचा तपास करताना तपास अधिकारी कुलकर्णी यांनी ज्या महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते त्याबाबतची माहिती त्यांनी न्यायालयास दिली. अनिकेतच्या खून दरम्यान तसेच त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या दरम्यानच्या कालावधीतील आरोपींचे मोबाईल संभाषण त्या अनुषंगाने सर्व सी डी आर/ एस डी आर, मोबाईल लोकेशन्स असा तपशील गोळा करण्यात आला होता तो न्यायालयास आज कुलकर्णी यांनी सादर केला. अनिकेत चा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या आंबोली येथील घटनास्थळाचा नकाशा त्याच प्रमाणे सांगली येथील घटनास्थळाचा नकाशा भूमि अभिलेख अधिकाऱ्यांकडून काढून घेण्यात आला ते दोन्ही नकाशे न्यायालयास सादर करण्यात आले. अनिकेत याच्या अस्थी न्यायवैद्यक परीक्षणानंतर पुढील धार्मिक विधीसाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्या. अनिकेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला त्या कारणाचा उल्लेख असलेला सविस्तर तपशीलाचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर आज सादर करण्यात आला.गुन्ह्यातील आरोपी हे सरकारी नोकर असल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्या साठी गृह विभागाच्या मंजुरीची गरज होती. मंजुरी मिळवण्याकरता गृह विभागाकडे या प्रकरणी सविस्तर तपशीलासह अहवाल पाठवण्यात आला होता अहवालाच्या अनुषंगाने शासनाच्या गृह विभागाकडून आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यास मंजुरी मिळाली. या मंजुरीचे पत्र न्यायालयास सादर करण्यात आले.
दरम्यान दुपारचे सत्रात सुनावणीचे कामकाज पुन्हा सुरू झाले. यावेळी मात्र वातावरण बदलले. बचाव पक्षाचे वकील विकास पाटील यांनी तपास अधिकारी कुलकर्णी यांचा उलट तपास नोंदवण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी कुलकर्णी यांना विचारलेल्या प्रश्नांवरून विशेष सरकारी वकील उज्वल निकम, तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी आणि बचाव पक्षाचे वकील विकास पाटील यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या. त्यामुळे वातावरण बदलले. आजची सुनावणी अपूर्ण राहिल्याने उद्या सुनावणी पुन्हा पुढे सुरू राहणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.