आता रोहित पवारांचाही पंकजांना सल्ला; म्हणाले जनतेसमोर या...
अहमदनगर, 2 जून : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पुन्हा एकदा पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. रासपच्या एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपलाच इशारा दिला आहे. मला कशाचीही भीती वाटत नाही, भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. काहीही मिळालं नाही तर मी ऊस तोडायला जाईल आणि महादेव जानकर हे मेंढ्या ओळायला जातील असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. विरोधकांचा भाजपवर निशाणा पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे.
पंकजा मुंडे यांनी आता परिणामाची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तर भाजपमध्ये आमचे काही सहकारी गेले आहेत, त्यांना कोणती पदं द्यावीत आणि जे भाजपमधील निष्ठावंत आहेत त्यांचं काय करावं असा प्रश्न भाजपला पडला असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता. संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधत पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे. नेमकं काय म्हटलं रोहित पवार यांनी?
आपलं मत जनतेसमोर ठेवून जनतेसाठी लढलं पाहिजे असा सल्ला रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. लोकनेते भाजपमध्ये गेल्यानंतर ते किती काळ लोकनेते राहतात हा विषय आता बघावा लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून जे नेते भाजपमध्ये गेले आज त्यांची अवस्था काय आहे. पूर्वी ते काय होते आणि आज त्यांची अवस्था काय झाली आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. लोकनेते भाजपमध्ये गेल्यानंतर शांत का होतात, शातं होतात की त्यांना शांत केलं जात? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी जर लोकनेता असतो तर कार्यकर्त्यांमध्ये गेलो असतो आणि लोकांचं मत काय आहे हे जाणून घेतलं असतं. माझा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला असता तरी मी लढलो असतो असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.