Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आषाढी कार्तिकी विसरू नका मज ! सागंतसे गुज पांडुरंग

आषाढी कार्तिकी विसरू नका मज ! सागंतसे गुज  पांडुरंग


आषाढी एकादशी म्हटले, की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी…संतांचे पालखी सोहळे अन्‌ वारकऱ्यांच्या दिंड्या…गेले शतकानुशतके भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला एकत्र होतो. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी पायी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी सुरू आहे. एका दृष्टीने बघायला गेले, तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच..दिंडी, पालखीसोहळ्यासोबत ही सामूहिक साधना केली जाते.

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागे माजी स्नान जे करिती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।।

ज्ञानोबा माऊली-तुकाराम।।…. जय जय राम।।क़ृष्ण हरी…; पुंडलिक वरदे ह।।ऱी विठ्ठल… असे शब्द कानी पडले तरी मराठी माणसाच्या मनात एक चैतन्य निर्माण होते. वारीची प्रथा म्हणजे द्वैत-अद्वैताचे मिलन.. परमेश्‍वर आणि मानवी आत्म्याचे एकरूप होणे आहे. जीवनाचे सफल्य, अध्यात्म-मन-आरोग्याची सांगड घालणारा हा काळ आहे. या वारीला मोठी परंपरा आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत सोपानकाका, आदिशक्ती मुक्‍ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, जगद्‌गुरू तुुकाराम महाराज, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा आदी संत मंडळींनी ही वारीची परंपरा जपली आणि वाढवली…आजही लाखो लोक ही परंपरा जपत आहेत. विठ्ठल चरणी समर्पित होऊन जगण्याची कला ही “वारी’ शिकवते.

आषाढी एकादशीलाच ही वारी पंढरपुरी जाते यालाही काही कारणे आहेत. या एकादशीला “देवशयनी’ एकादशीही म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. हा काळ पावसाळ्याचा आहे. पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारा हा काळ आहे. आषाढ महिन्यातील शुक्‍ल पक्षातील एकादशीला “देवशयनी’ आषाढी एकादशी म्हटले जाते. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.

आषाढी ते कार्तिकी देव निद्रिस्त

या दिवशी देव निद्रिस्त होतात, अशी समजूत आहे. या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले जाते, अशी श्रद्धा आहे. वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले, असेही लोक मानतात आणि म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आणि येथील वैकुंठ भूनिवासी पांडुरंगाला ते या काळात भेटायला जातात. यानंतरचे चार महिने देव शेषावर निद्रिस्त होतात ते दिवाळीदरम्यान म्हणजे कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखली जाते.

मन धावे विठ्ठलाचरणी…

दशमीला वारी वाखरीला पोहोचते. वाखरी ते पंढरपूर हे अंतर केवळ 7 ते 8 किलोमीटरचे आहे. मात्र, हे अंतर या वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या या वारकऱ्यांचे मन आधीच त्याच्या पायाशी विसावलेले असते आणि हे अंतर शरीराने जवळ करण्यासाठी हे वारकरी अक्षरशः धावत सुटतात. पांडुरंगाच्या राऊळाचा कळस दिसला की, कृतकृत्य होतात आणि “जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता….’ म्हणत मागे फिरतात. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून केवळ कळसाचे दर्शन घेऊन वारकरी परतात. हा विठ्ठलाठायीचा भाव वारकऱ्यांना सुखाचा आनंद देतो आणि पुढच्या वर्षीचे परत येण्याचे आश्‍वासन देवालाच देत हा सोहळा संपतो.

गोपालकाल्याने वारीची सांगता: 

वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. येथून आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळूहळू पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल….’ आणि “जय जय राम कृष्ण हरी’ या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता श्रीविठ्ठल-रुक्‍मिणी यांची सजवलेल्या रथातून प्रदक्षिणा मार्गाने मिरवणूक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपाळकाला होऊन वारीची सांगता होते. पुन्हा सर्व संतांच्या पालख्या परतीच्या मार्गाला लागतात. त्यालाच आपण परतवारी म्हणतो…

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.